अहमदनगर शहर शिवसेनेत अंतर्गत बंडाळी आली समोर


वेब टीम : अहमदनगर
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी महापालिका गटातील तीन जागांसाठी अर्ज भरलेल्या 18 पैकी 13 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपच्या आशाताई कराळे यांची बिनविरोध निवड झाली.

तर 2 जागांसाठी 4 जण रिंगणात असून त्यातील एका जागेसाठी अमोल येवले विरुद्ध अनिल शिंदे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर उभे राहिले. त्यामुळे शहर शिवसेनेतील बंडाळी चव्हाट्यावर आली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. जिल्हापरिषद 1, नगर पालिका 1 व महापालिकेच्या 3 जागांचा यात समावेश आहे. त्यात महापालिकेच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गात एक जागा बिनविरोध झाली.

नगरपालिकेच्या एका जागेसाठी सहापैकी पाच जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगरपालिकेची एक जागा बिनविरोध झाली. जिल्हा परिषदेची एक जागा याआधीच बिनविरोध झाली आहे.

महापालिकेतील दोन जागांसाठी सर्वसाधारण, नागरिकांचा मागास अशा दोन प्रवर्गात प्रत्येकी दोन उमेदवार राहिल्याने सरळ लढत होणार आहे. महापालिकेच्या एका जागेसाठी अमोल येवले विरुद्ध अनिल शिंदे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर उभे राहिले.

अनिल शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादी’ च्या उमेदवारांनी माघार घेतली. मात्र, शिवसेनेच्याच उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत बंडाळी यानिमित्ताने पुढे आली आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे नियोजन कोलमडलेले दिसत आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या आशा कराळे बिनविरोध झाल्याने भाजप यशस्वी ठरला आहे. शिवसेनेच्या अंतर्गत कुरघोडीला विधानसभा निवडणुकीतील राजी-नाराजीचेच कारण असल्याची चर्चा रंगली आहे.

या 2 जागांसाठी 24 डिसेंबरला मतदान आणि 26 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी महापालिकेतील 68 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे काम पाहत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post