अहमदनगर : कैद्याने केला महिला पोलिसांवर चाकूने हल्ला


वेब टीम : अहमदनगर
कारागृहाच्या गेटवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलिसाच्या गळ्यावर चाकूने वार करून कारागृहातील कैद्याने पळुन जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना जिल्हा कारागृहात रविवारी (दि.22) दुपारी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, महिला पोलिस सुजाता निवृत्ती शेळके उर्फ सुजाता गोपाल हाडवळे (वय 27) या कारागृहातील मेन गेट येथे सहकार्‍यांसोबत बंदोबस्त करीत होत्या. 

त्यावेळी बंदी क्र. 107/2019 पावलस कचरू गायकवाड याने स्वयंपाक गृहातील चाकू घेतला व कारागृहातुन पळुन जाण्याच्या उद्देशाने शेळके यांच्या डोक्याचे केस धरून गळ्यावर चाकुने वार केला.

तो वार शेळके यांनी डाव्या हातावर झेलला. त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. गायकवाड यांनी शासकीय कामात अडथळा आणुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला.

पावलस गायकवाड याच्या विरूध्द पारनेर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 307, 328, 363, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे खुनाचा प्रयत्न, पळवुन नेणे, शिवीगाळ करीत धमकावणे अशा गुन्ह्याची नोंद आहे. गुन्ह्याचा दावा न्यायाधित असल्याने गायकवाड यास जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. चाकू हल्ल्यात सुजाता शेळके या गंभीर जखमी झाल्या.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुजाता शेळके उर्फ सुजाता हाडवळे यांच्या फिर्यादीवरून भादंविक 307, 353, 333, 224, 511 सह कारागृह नियमावली कारागृहीत शिक्षा प्रकरण क्र. 26 मधील क्र. 13 चा भंग केला तसेच प्रिझन अॅक्ट 1884 प्रकरण 11 मधील पिझन ऑफेन्स मधील नियम 45 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास वाघ हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post