मुख्यमंत्र्यांचा मराठी बाणा; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी


वेब टीम : मुंबई
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे. या पत्रात ठाकरे म्हणतात, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

संबंधित विभागाने सदर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळविले आहे. बराच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post