अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी साडे चौदा हजार कोटींची केंद्र सरकारकडे मागणी


वेब टीम : नागपूर
राज्यात उदभवलेली पूरस्थिती आणि अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या घरे आणि शेतीच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १४ हजार ४९५ कोटी रुपयांची मागणी केली,अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.

विधान परिषदेत मंगळवारी विरोधी सदस्यांनी शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली. त्यावरून सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते. त्याच दरम्यान अर्थमंत्री पाटील यांनी नुकसान भरपाई बाबत माहिती दिली.

ऑगस्टमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मोठा पूर आला होता. त्याच्या भरपाईसाठी ७ हजार २०७ कोटी आणि राज्यातील अवकाळी भरपाईसाठी ७ हजार २८८ कोटी, असा एकूण १४ हजार ४९५ कोटीचा निधी केंद्राकडे मागितला असल्याचे पाटील म्हणाले.

विरोधकांनी शेतकर्‍याच्या नावे इथे नुसते गळे काडू नयेत, त्यापेक्षा केंद्रात तुमचे सरकार आहे, हा निधी लवकर मिळावा यासाठी दिल्लीत प्रयत्न करावेत, असा टोला त्यांनी मारला. विरोधकांना गोंधळात रस आहे,चर्चा करण्यात नाही.

शेतकर्‍यासाठी आमचे सरकार चांगले निर्णय घेत आहे, त्यांना ते नको आहेत. पूरस्थितीच्या वेळी विरोधकांचे राज्यात सरकार होते. पण, त्यांनी मदत केली नाही. म्हणूनच त्यांना विरोधात बसण्याची वेळ आली आहे, असा त्यांनी चिमटा काढला.

हे सरकार शेतकर्‍याना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍याच्या पाठीशी हे सरकार खंबीर उभे आहे. शेतकर्‍यांना योग्य अशी भरपाई दिली जात आहे. विरोधकांच्या तत्कालीन सरकारने केलेल्या चुका आम्ही दुरुस्त करत आहोत,आपल्या सरकारने केलेल्या चुकांसाठी विरोधकांना गोंधळ घालायची वेळ आली आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post