कर्जमाफीसाठी भाजप सदस्यांनी घातला गोंधळ; सभागृहाचे कामकाज तहकूब


वेब टीम : नागपूर
हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. हा दिवस अवकाळीच्या भरपाईने गाजला. विरोधीपक्ष भाजप सदस्यांनी अवकाळीचा सरसकट हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी आज केली. या मुद्यावर कामकाज दोन वेळा तहकूब झाले. त्यानंतरही सभागृह पूर्ववत होऊ शकले नाही. परिणामी दिवसभराचे कामकाज वाया गेले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृह १२ वाजता सुरु होताच अवकाळी भरपाईबाबत २८९ चा स्थगन प्रस्ताव मांडण्यास परवानगी मागितली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना दोन मिनिटे बोलण्यास संधी दिली.

शिवसेनेचे अनिल परब यांनी त्याला आक्षेप घेतला. २८९ प्रस्ताव फेटाळला असूनही त्यावर बोलू दिल्यास तशी नवी प्रथा पडेल,असे मत त्यांनी व्यक्त केले. तरी सभापती यांनी प्रवीण दरेकर यांना बोलण्यास संमती दिली.

दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अवकाळी नुकसान पाहणी दौर्‍यावर गेले होते. तेव्हा त्यांनी शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी २५ हजार भरपाईची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असल्याने त्यांनी सभागृहात घोषणा करावी. राज्यातील १ कोटी ४ लाख शेतकर्‍यांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. सरकारने तात्काळ या शेतकर्‍याना मदत करावी अशी त्यांनी मागणी केली.

सभापती यांनी चर्चेस नकार देत प्रस्ताव फेटाळला. त्यावर विरोधक थेट वेलमध्ये उतरले. त्यांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. सामना दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातम्याचे फलकही विरोधकांनी फडकावले.

त्यावर मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांधावर आलो आहे, असे उद्धव यांची दौर्‍यातील बातमीत होते.सताधारी सदस्यांनी ते फलक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात रस्सीखेच दिसली.

हा सर्व गोंधळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताशपणे पाहत होते. या गोंधळात सभागृह दोन वेळा तहकूब झाले, पण गोंधळ काही थांबला नाही. उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सभागृह चालवण्याचा प्रयत्न केला. विरोधी सदस्यांना नाव घेऊन समज दिली.पण, विरोधक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post