पंकजा पक्ष सध्यातरी बदलणार नाहीत; मात्र माझा भरवसा नाही : खडसेंची खदखद


वेब टीम : परळी
गोपीनाथ गडावर आज भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी झाली. या मंचावरून बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पक्षावरची नाराजी आणि खदखददेखील त्यांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे म्हणाले, जनसंघापासून आजच्या भाजपपर्यंत वाटचाल आम्ही पाहिली आहे. देशात दोन खासदार आणि महाराष्ट्रात १० च्या पुढे आमदार जात नव्हते. शेठजी, भटजीचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होती.

त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. मात्र, भाजपचं राज्यात चित्र आहे ते जनतेला मान्य नाही. या मंचावर उपस्थित बागडे म्हणाले की, पक्षविरोधी बोलू नका. माझ्याकडे बोलण्यासाठी खूप आहे.

परंतु मग माझ्यावर शिस्तभंगाचा गुन्हा लागेल, असंही खडसे यावेळी म्हणाले. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडेंसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या आठवणीत रडावं वाटतं. पंकजा हरल्या याचंही दुःख वाटतं.


पण पंकजा ही वाघाची पोरगी आहे. ती खचून जाणारी नाही. ती सक्षमपणे पुन्हा त्याच ताकदीने उभी राहणार आहे. त्याचप्रमाणे, पंकजा मुंडे पक्ष बदलणार नाहीत; मात्र माझा काही भरोसा नाही. ज्यांनी पक्ष मोठा केला त्यांना आज पक्षात गुदमरल्यासारखं का वाटतंय?

पक्ष सोडून द्यायला भाग पाडलं जात आहे. तशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. आपोआप पक्ष सोडून गेले पाहिजेत ही नीती पक्षातल्या लोकांकडून राबवली जाते आहे, ती योग्य नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post