विखे पिता -पुत्रांनी राहुरी कारखाना फक्त निवडणुकीपुरताच चालू केला


वेब टीम : अहमदनगर
राहुरी येथील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडील थकबाकीचा आकडा 130 कोटी रुपयांवर पोहचल्याने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने वसुलीसाठी नियमाप्रमाणे कारखान्याला नोटीस दिली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांनी दिली आहे.

राहुरी कारखान्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष गायकर यांनी ही माहिती दिली. यावेळी बँकेचे संचालक शिवाजी कर्डिले, कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

राहुरी कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी कर्डिले यांनी प्रयत्न केले. त्यावेळी विखे पिता-पुत्रांनी कर्डिलेंशी संपर्क साधला. त्यावेळी कारखान्याकडे बँकेची 92 कोटीची थकबाकी होती. कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर बँकेने संचालक मंडळाला 92 कोटीचे 10 हप्ते पाडून दिले.

पहिले दोन वर्षे केवळ व्याज घेण्याचे ठरले होते. मात्र आज या कारखान्याची थकबाकी व्याजासह 130 कोटीवर पोहचली असल्याने बँकेने नियमाप्रमाणे त्यांना वसुलीची नोटीस दिली असल्याची माहिती गायकर यांनी दिली.

कारखाना सभासद, शेतकर्‍यांचा रहावा ही आमची भूमिका आहे. संचालक मंडळाने नियमांचे पालन केले नाही. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कारखाना बंद करून विखे पिता-पुत्रांना वर हात करायचे होते अशी चर्चा खासगीत होत आहे.

याबाबतचा रोष बँकेवर येऊ नये किंवा आमच्यावर ठपका येऊ नये म्हणून आपण पत्रकार परिषद घेत असल्याचे स्पष्ट करत माजी आ. कर्डिले म्हणाले की, विखे पिता-पुत्रांना केवळ निवडणुकीपुरता कारखाना सुरू करायचा होता.

कारखाना विखे पिता-पुत्रच चालवत असून संचालक मंडळाला चहाचाही अधिकार नाही. आता कारखाना सोडून देण्याच्या तयारीत विखे असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post