हिंदुत्वाच्या ज्या शाळेचे तुम्ही विद्यार्थी, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर : शिवसेनेचा भाजपला टोला


वेब टीम : दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं असून त्यावर चर्चा सुरू आहे. भाजपचा जुना सहकारी असणाऱ्या पण सध्या फारकत घेतलेल्या शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र राज्यसभेत शिवसेना खासदारांनी मतदान न करता काढता पाय घेतला. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला.  ते म्हणाले, आमच्या मनात या विधेयकाबाबाबत काही शंका आहेत. सरकारने या शंका दूर कराव्यात. जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर पुढे काय करायचं ते बघू, अशी मांडली आहे. जे या विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत ते द्रेशद्रोही ठरणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.

राऊत म्हणाले की, या विधेयकाबाबत आमच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन सरकारने करावे. तर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर पक्षाची भूमिका लोकसभेपेक्षा वेगळी असेल. शंकांचं समाधान झालं तर आम्ही विचार करु. राज्यसभेतील परिस्थिती वेगळी आहे.

जे विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत त्यांना देशद्रोही ठरवणार आहात का ? कोणीही व्होटबँकेचं राजकारण करू नये. ते योग्य नाही. हिंदू-मुस्लीम फुटीचे पुन्हा प्रयत्न करू नयेत.

या विधेयकात श्रीलंकेतील तामिळ हिंदुंबाबत काही नाही. मात्र, यासंदर्भात पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मानवतेला कोणताही धर्म नसतो आणि शिवसेना दबावाचं राजकारण करत नाही.

आम्हाला आमच्या राष्ट्रवादासाठी किंवा हिंदुत्वासाठी कोणत्या प्रमाणपत्राची गरज नाही. (हिंदुत्वाच्या) ज्या शाळेत तुम्ही शिकता आम्ही त्या शाळेचे मुख्याध्यापक आहोत. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, श्यामा प्रसाद मुखर्जी हे होते आणि आम्ही या सगळ्यांना मानतो, असा टोलाही राऊत यांनी भाजपला मारला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post