दहशतवाद्यांच्या बंदोबस्तासाठी लष्कराकडे अनेक पर्याय : लष्करप्रमुख नरवणे


वेब टीम : दिल्ली
लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला ऐतिहासिक पाऊल म्हटले. या निर्णयामुळे काश्मीरला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल, असे ही ते म्हणाले.

लष्कर प्रमुखांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला इशारा दिला. लष्कर झीरो टॉलरन्सच्या नीतीवर चालते आणि दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडे बरेच पर्याय आहेत,असे ते पाकिस्तानचा उल्लेख न करता म्हणाले. यावेळी त्यांनी लष्कराच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली.

लष्कर दिनानिमित्त लष्कर प्रमुख नरवणे यांनी लष्कराच्या भविष्यातील योजना, दहशतवाद सारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. ‘उत्तरेकडील सीमेवर शांतता आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय हे ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयामुळे काश्मीरला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

लष्कराचे आधुनिकीकरण होत आहे. भविष्यात होणाऱ्या युद्धाच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप स्थापन होत आहे. स्पेस, सायबर, विशेष कारवाया, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरवर भर देण्यात येत आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे नरवणे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post