आता ग्रामसेवक करणार वीजबिलाची वसुली; संघटनेचा विरोध


वेब टीम : अहमदनगर
राज्य सरकार व वीज नियामक मंडळाने ग्रामीण भागातील वीज बिल वसुलीचे काम ग्रामसेवकांकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. या निर्णयाला ग्रामसेवक संवर्गाने तीव्र विरोध केला असून नगर जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या बैठकीत या निर्णयाला कडाडून विरोध करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत ग्रामसेवक वीज बिल वसुलीचे काम करणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी जाहीर केले आहे.

अकोले तालुक्यातील रतनवाडी येथे जिल्हा ग्राम सेवक युनियन, अकोले तालुका ग्रामसेवक युनियनची त्रैमासिक सभा तसेच जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची मासिक सभा नुकतीच युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या सभेत ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठीची दिशा निश्चित करण्यात आली. या सभेत ग्रामसेवकांपुढील भविष्यातील आव्हाने व ताणतणावमुक्त आनंदी जीवन या विषयावर परिसंवादही घेण्यात आला.

या बैठकीस ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पावशे, अशोक नरसाळे, सुनिल नागरे, सुरेश मंडलिक, बाबासाहेब आमरे, रमेश बांगर, मंगेश पुंड, बी.वाय. कडू, रवींद्र ताजणे, सोमनाथ गभाले, सुभाष जाधव, गोवर्धन रांधवणे, संदीप लगड, ज्ञानेश्वर सुर्वे, भगवान भांड, नेताजी भांबड, जयश्री काशिद, आशा दातीर, शितल पेरणे, कमल पावसे, उज्वला नवले, कल्पना दुर्गुडे, सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर, नफीस खान पठाण आदींसह जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक ग्रामसेवक उपस्थित होते.

ग्रामसेवकांकडील कामगार नोंदणी प्रमाणपत्र नोंदणीचे अतिरिक्त काम काढून घेण्यात यावे, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कामाची सक्ती करण्यात येवू नये, निवडणुकी विषयीची सर्व कामे काढून घ्यावीत, जिल्हा परिषद स्तरावर कालबध्द पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, 2005 नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचा-यांच्या अंशदायी पेन्शन योजनेचे व काल बाद कालबाह्य पदोन्नतीचा प्रश्न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल, हिशेब तात्काळ मिळावेत, ग्रामपंचायत दप्तर तपासणी करताना ग्रामसेवकांना पूर्वकल्पना देण्यात यावी, तक्रार नसताना दप्तर तपासणी करण्यात येवू नये तसेच ग्रामसेवकांवर एकतर्फी निलंबनाची कारवाई करण्यात येवू नये आदी मागण्यांचे ठराव बैठकीत करण्यात आले. ग्रामसेवक संवर्ग अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शासकीय कामकाज करीत आहे. कामाचा अतिरिक्त बोजा वाढत असल्याने ग्रामसेवकांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. हि परिस्थिती अतिशय गंभीर असून, सरकार तसेच प्रशासनाने ग्रामसेवकांच्या प्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post