जागतिक कर्करोग दिन : जास्त तेलकट पदार्थ खाताय? मग होऊ शकतो कॅन्सर


वेब टीम : मुंबई
जगभरातील एकतृतीयांश कर्करोग तंबाखू ओढल्याने, चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने होतात. धूम्रपानामुळे फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

धूम्रपान किती वर्षे चालू आहे आणि किती खोलवर धूर फुप्फुसांमध्ये जातो यावर धूम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण अवलंबून आहे. दररोज दहा सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये १० पटीने धूम्रपानांमुळे होणारे आजार वाढतात.

धूम्रपान सोडल्यास त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाची शक्यता कमी होते. तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानामुळे स्वरयंत्र, घसा, फुप्फुसे, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, जठर, यकृत, प्रोस्टेट आणि मूत्राशयांच्या कर्करोगाचा धोका असतो.

दारूच्या व्यसनामुळे यकृत, तोंड, घसा, स्वरयंत्र आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाची शक्यता वाढते. मद्याचे सेवन केल्यानंतर अॅरसिटाल्डीहाइड नावाचे घातक कार्सिनोजन शरीरात तयार होते.

जे डीएनएला इजा करून कर्करोगाचा धोका वाढवतो. तसेच जनुकीय बदलांमुळे काही व्यक्तींमध्ये, मद्यसेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका जास्तच वाढतो.

स्तन, बीजांड, प्रोस्टेट आणि मोठय़ा आतडय़ांचा कर्करोग हा काही कुटुंबांमध्ये जनुकीय कारणांमुळे आढळून येतो. जीवनशैली आणि पर्यावरणातील बदल यांमुळे जनुकीय बदल होऊन कर्करोग होऊ शकतो.

जनुकीय कारणाने आलेले जनुकीय बदल पुढच्या पिढीत असले म्हणजे त्यांना कर्करोग होईलच असे नाही पण त्यांच्यामध्ये कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

अति तेलकट आहारामुळे मोठे आतडे, गर्भाशय आणि प्रोस्टेटचा कर्करोग होऊ शकतो. संशोधनाद्वारे तेलकट आहाराचा कर्करोगाशी संबंध काही प्रमाणात सिद्ध झाला आहे.

लठ्ठपणामुळे शरीरातील इस्ट्रोजनची पातळी वाढते आणि स्तनांच्या कर्करोगाची शक्यतासुद्धा वाढते. आहारातील जादा उष्मांकाचासुद्धा स्तनांच्या कर्करोगाशी संबंध आढळून आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post