जनतेला भाजीपाला मिळेल; भाजीपाला वाहतूक विनाअडथळा सुरु राहील


वेब टीम : सातारा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे. नागरिकांनी यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मुंबई तसेच पुणे येथील बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला तसेच अन्नधान्याचे टेम्पो, ट्रक आलेले आहेत. सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला भाजीपाला मुबलक प्रमाणात मिळावा यासाठी काम सुरु आहे. गावांमध्ये, प्रभागांमध्ये भाजीपाला नेण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाल्याची विक्री प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, याला जनतेचाही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. तसेच नागरिकांना घराशेजारी दुकानांमधूनही भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

मुंबई व पुणे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा माल येत आहे. पुण्यात 95 ठिकाणी तसेच प्रभागांमधून भाजीपाला विक्री सुरु करण्यात आली आहे. भाजीपाला योग्य प्रमाणात मिळत असून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्याची  वाहतूक तसेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही  सूट देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपला उत्पादित माल बाजार समित्यांमध्ये घेऊन जावा. सातारा जिल्ह्यात लहान-लहान मंडई सुरु करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे,  यामुळे गर्दी नियंत्रणात राहणार आहे. तसाच प्रयोग राज्यात इतरत्रही होत आहे.

कोरोना हे राष्ट्रीय संकट असून याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला घ्यावा. 21 दिवसांसाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनला जनतेने सहकार्य करावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post