कोरोनाच्या कठीण काळात तरी राजकारण करणे थांबवा : ममता


वेब टीम : दिल्ली
केंद्र सरकारने कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कठीण काळात राजकारण करणे थांबवावे अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी ही विनंती केली.

नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे असे ही स्पष्टपणे सांगितले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आम्ही एक राज्य म्हणून कोरोनासोबत लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

केंद्राने अशा कठीण काळात राजकारण करु नये. आम्ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसेच इतर मोठ्या राज्यांच्या सीमांनी व्यापलो आहोत.

आमच्यासमोर बरीच आव्हाने आहेत. सर्व राज्यांना समान महत्त्व दिले पाहिजे.आपण टीम इंडिया म्हणून काम करणे गरजेचे आहे. ”

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे.

मात्र अद्यापही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही.

त्यामुळे लॉकडाऊन वाढवला जाणार की नियम शिथील करत सेवा सुरु केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सरकारने आता पुढे वाटचाल करण्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

याच बरोबर मोठा दृष्टीकोन असण्याची गरज असल्याचे ही म्हटले.

कोरोना विरोधातील लढाईत आपल्याला बऱ्यापैकी यश मिळाल्याचे जग सांगत आहे.

या लढाईत राज्य सरकारांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे.

त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असून धोका रोखण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावण्याचे काम केले आहे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post