दिलासादायक... एन ९५ मास्कच्या किमतीत झाली घट...


वेब टीम : दिल्ली
एन-९५ मास्क उत्पादन करणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी आणि आयातदारांनी मास्कच्या दरात ४७ टक्के कपात केल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली.

औषध आणि संबंधित साहित्य यांच्या किमती नियंत्रणात ठेवणाऱ्या एनपीपीए संस्थेने एन-९५ मास्क देशात स्वस्त करण्यासाठी पावले उचलल्यानंतर बाजारात त्यांचा भाव कमी झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जाहीर झाल्यानंतर आणि त्यासाठी एन-९५ मास्क उपयुक्त असल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर देशातील बाजारांमध्ये १५० रुपयांचा हा मास्क तब्बल ३०० रुपयांना विकला जात होता.

एनपीपीएच्या सल्लामसलतीनंतर आता त्याचा भाव कमी झाला आहे.

रसायन आणि खत मंत्रालयाने सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

एनपीपीएने पावले उचलल्यानंतर या मास्कची किंमत कमी झाली असून आता सर्वसामान्यांसाठी हे मास्क स्वस्त दरात उपलब्ध आहेत, असे मंत्रालयाने या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पत्रकानुसार एनपीपीएने २१ मे रोजी सर्व मास्क उत्पादक आणि आयातदारांशी चर्चा सुरू केली आणि एन-९५ मास्कच्या बिगर-सरकारी खरेदीसाठी मूल्य एकसमान आणि व्यवहार्य ठेवण्याची सूचना केली.

एनपीपीएने मुंबई उच्च न्यायालयातदेखील असे सांगितले आहे की, एन-९५ च्या पुरवठा आणि मागणीतील तफावतीवर आपण लक्ष ठेवून आहोत आणि उत्पादक, आयातदार आणि पुरवठादार यांना स्वेच्छेने मास्कची किंमत कमी करण्यास सांगितले आहे.

उच्च न्यायालयामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाच्या उत्पादनाचा भाव निश्चित करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्राधिकरणाने आपली बाजू मांडली होती.

सरकारने आता एन-९५ मास्कचा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे.

तसेच आवश्यक वस्तू अधिनियमदेखील या मास्कना लागू करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post