अहमदनगर : गरिबांच्या तोंडातील घास घेऊन जात होते काळ्या बाजारात; पोलिसांनी केली कारवाई


वेब टीम : अहमदनगर
जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळाची ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चापडगाव शिवारात पोलीसांनी पकडला

याबाबत पोलिसांनी ट्रक चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी आ. रोहीत पवार यांनी राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानात छापा टाकून मोठ्या प्रमाणावर धान्य साठा हस्तगत केला होता

त्यानंतर गुरुवार २८ मे रोजी पुन्हा २४ टन तांदूळ पकडल्याने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संशयाच्या भव-यात असल्याचे भासत आहे.

याबाबत माहिती अशी की, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना २८ मे रोजी गुप्त बातमीदाराने माहिती दिली की सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळ गुजरात राज्यात विक्री करण्या साठी सोनेगाव, नान्नज, चोंडी, चापडगाव मार्गे जाणार आहे.

या खबरीवरून सातव यांनी सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक रवाना केले.

दुपारी तीनच्या सुमारास चोंडी शिवारात तांदूळाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच ४५ टी ७३९६) आला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस नाईक केशव व्हटकरे, भरत गडकर, आण्णासाहेब कोळेकर, संतोष साबळे, हृदय घोडके, आदीत्य बेलेकर, सागर जंगम, लहु खरात यांच्या पथकाने सदर ट्रक अडवला

ट्रक चालक शशिकांत भिमराव गवळी (रा. कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर) व सहायक चालक संदिप सुनील लोंढे ( रा. बारलोणी ता. माढा, जि. सोलापूर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर तांदूळ सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान चालक मंदा सुग्रीव वायकर यांचा असून तो गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांनी याबाबत तालुका पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून तपासणी केली असता सदर तांदूळ हा सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे सांगितले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला सरकार धान्य देत असताना दुकान चालक मापात पाप करून व नागरीकांना न वाटता तो काळ्या बाजारात विकून पैसे कमावण्याचा धंदा करीत आहेत.

आ. रोहीत पवार यांनी पंधरा दिवसापूर्वी राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर तांदूळ, गहू साखरेचा कोटा हस्तगत करून दुकानाचा परवाना निलंबित केला होता.

त्यानंतर पुन्हा गुरुवार रोजी काळ्या बाजारात विक्रीसाठी रेशनिंगचा २४ टन तांदूळ पकडला यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार बाबत संशय निर्माण झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post