मोदींनी दिले १००० कोटी; ममता म्हणाल्या वादळामुळे झालेले नुकसान १ लाख कोटींचे


वेब टीम : कोलकाता
कोरोना आणि त्यातच अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी केली.

यावेळी त्यांच्या बरोबर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या.

या हवाई दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालसाठी १००० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली.


नुकसान एक लाख कोटींचे झाले असताना मदत म्हणून फक्त १००० कोटी दिले जात आहेत,असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केलीय परंतु, यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

ही मदत कधीपर्यंत मिळेल, हे देखील स्पष्ट नाही. ५६ हजार कोटी रुपये तर आमचेच केंद्राकडे थकित आहेत, असे ही ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटले.

अम्फानच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र काम करूनही आम्ही ८० जणांचे प्राण वाचविण्यात अपयशी ठरलो.

आम्हाला याचे दु:ख आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या सदस्यांना गमावलंय त्यांच्या प्रती केंद्र आणि राज्य सरकारच्या संवेदना आहेत’ असे ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या नागरिकांशी बोलताना म्हटले.

लोकांना मदत करण्यासाठी राज्य आणि केंद्र मिळून काम करत आहे.

तत्काळ राज्याला कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी १००० कोटी रुपये भारत सरकारकडून उपलब्ध करून दिले जातील.

पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post