खासगीकरण सुरूच.. देशातील तीन विमानतळं चालविणार अदानी समूह..


वेब टीम : दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली. 


सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समूहाला दिल्याची माहिती सरकारने दिली. 


मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे एका खासगी वृत्तसंस्थेने म्हटले


लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ,अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या देखभालीचे हक्क २०१९ साली खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी उद्योग समूहाला दिली होती. 


याच निर्णयाची अंमलबाजवणी करण्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले असून जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममधील विमानतळाचे हक्क अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहापैकी लखनौ,अहमदाबाद आणि मंगळूरू विमानतळाचे हक्क अद्याप भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे असून लवकरच तेही अदानी कंपनीला देणार आहेत. 


लखनौ,अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.


फेब्रुवारी २०१९ मध्ये अदानी समूहाने देशाच्या नागरी हवाई सेवाक्षेत्रात उतरताना सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले. स्पर्धकांच्या तुलनेत अधिक रकमेची बोली लावूनही अदानी समूहाला हे कंत्राट मिळाले. 


समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले असून त्यासाठी प्रति प्रवासी अनुक्रमे १७७, १७४, १७१, १६८ आणि ११५ रुपये भाडे निश्चित केले. या करारामुळे पुढील ५० वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असणार आहे.


अदानीच्या स्पर्धेत दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचे परिचलन करणाऱ्या जीएमआरची निविदा कमी रकमेची असूनही अदानीची निवड झाली. गुवाहाटी विमानतळ वगळता यादीतील इतर पाच विमानतळांकरिता १० कंपन्यांच्या ३२ तांत्रिक निविदा आल्या होत्या. 


यापैकी कंत्राटविजेत्या अदानीचा आता या क्षेत्रातही उतरताना दिसत आहे. समूह सध्या बंदर, जहाज,ऊर्जा तसेच अन्य पायाभूत क्षेत्रात कार्यरत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post