विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही; राऊतांचा फडणवीसांना टोलावेब टीम : मुंबई

राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपानं मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. 


भाजपाकडून करण्यात आलेल्या या आंदोलनाबरोबरच फडणवीस यांनी मंदिरं खुली करण्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे.


“सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पण सध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. 


विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही. 


महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने काल (२९ ऑगस्ट) सर्वत्र घंटानाद केला. कुठे थाळीनाद केला. 


करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. 


विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.


“लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण करोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय? 


धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळते असे देवेंद्र फडणवीस सांगतात. 


पण भाजपातर्फे जे घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे. 


त्यामुळे मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे. 


ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. 


मनःशांती राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक कार्यातही असते. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. 


आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे!,” असा सल्ला देत शिवसेनेनं फडणवीसांना चिमटा काढला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post