मंदिर उघडण्यावरून औरंगाबादेत तणाव... एमआयएम- शिवसेना आमनेसामने..वेब टीम : औरंगाबाद

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे राज्यातील धार्मिकस्थळे खुली करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 


आज दुपारी दोन वाजता इम्तियाज जलील हे शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरात प्रवेश करणार होते. 


मात्र एमआयएमच्या मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला शिवसेनेने जोरदार विरोध केला. खडकेश्वर मंदिर हे हिंदूंचे मंदिर आहे. 


खासदार जलील हे मुस्लिम आहेत. त्यामुळे ते हिंदूंच्या मंदिरात प्रवेश कसे करू शकतात, असा सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. 


त्यामुळे शिवसेना आणि एमआयएम आमने-सामने आली आहे. 


परिणामी परिसरात तणाव निर्माण झाला असून खासदार इम्तियाज जलील यांनी आपले आजचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.


आज दुपारी आंदोलनासाठी एमआयएमचे कार्यकर्ते खडकेश्वर मंदिर परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. 


ते खडकेश्वर मंदिरात प्रवेश करणार होते. 


मात्र याठिकाणी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते पोहोचले, त्यांनी मंदिर उघडण्यास विरोध केला.


यावेळी खैरे म्हणाले, ‘मी इथेच उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहू. आम्ही मंदिर उघडण्यासाठी समर्थ आहोत.’


 खैरेंच्या या टीकेवर उत्तर देताना इम्तियाज जलील यांनी म्हटले, ‘हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. 


हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये. ज्यांना धर्माच्या नावाने राजकारण करायचं आहे ते लोक असा वाद घालतात. 


मी जनतेचा खासदार आहे जनतेचे प्रश्न सोडवणार. मी मंदिरात गेलो तरी मंदिराचे पूर्ण पावित्र्य राखणार. तिथे माझ्या सोबत हिंदू बांधवही असणार आहेत.’


दरम्यान, ‘राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू’, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन 27 ऑगस्टला ठाकरे सरकारला दिले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post