संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव... यामध्ये भविष्यातील राजकारणही...वेब टीम : मुंबई

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयाला मुघलांचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाणार आहे, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केली होती. 


हे संग्रहालय सध्या चर्चेत आहे. यावरून महाराष्ट्रातही राजकीय चर्चा रंगल्या आहेत. 


आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक सदरात हे भविष्यातील राजकारण असल्याचे म्हटले आहे.


आग्रा दरबारात पुन्हा छत्रपती शिवाजीराजे पोहोचले व त्यांनी औरंगजेबाच्या हातातली तलवार खेचून घेतली असेच नाट्य जणू घडत आहे. 


आग्य्रातील ‘मुगल म्युझियम’चे नाव मुख्यमंत्री योगी महाराजांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ केले यात श्रद्धा, आदर, तितकेच भविष्यातले राजकारण आहे. 


असे म्हणत संजय यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करत दुसऱ्या अर्थाने टीकाही केली आहे.


आजच्या सामनातील रोखठोक…


उत्तर प्रदेशात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम उभे राहत आहे. अयोध्येत राममंदिर उभे राहण्याइतकेच हे महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांचे स्मरण करणे हा राष्ट्रधर्म आहे. अमुक-तमुक त्याच्या क्षेत्रातील ‘छत्रपती शिवाजी’ आहे असे म्हणणे म्हणजे त्याने त्याच्या क्षेत्रात शिखरच गाठले असा अर्थ होतो. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी छत्रपतींचा उल्लेख फक्त ‘शिवाजी’ असाच केला जात असे. हे एकेरी संबोधन आता सगळय़ांना खटकते, पण त्या संबोधनात भक्ती व आदर होता. एका शिवजयंती उत्सवात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले, ‘‘I am the shivaji of marathi language.’’ चिपळूणकरांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणत असत.


या उक्तीचे समर्थन आणि स्पष्टीकरण नागपूरचे डॉ. वि. भि. कोलते असे करतात-

‘होता शिवाजी

न जाती तरी मातृभूमी अविंधांचिया बंधनी शेंडी शिरी राहती ना मुळी, भ्रष्ट होत्या सदा हिंदूंच्या

नंदिनी I

विष्णूविना पूज्य भाषा मराठी तशी हाय! ही कां न आंग्लाळती।

सौभाग्य होते को नष्ट तिचे,

तिची काव्य गंगा का भ्रष्ट!”

ही छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी आहे.


रोमांचक सुटका…


छत्रपती शिवराय यांच्या अवतारकार्यात ‘आग्र्याहून सुटका’ या रोमांचक नाटय़ास कमालीचे महत्त्व आहे. असे नाट्य कोणत्याही राजाच्या जीवनात घडले नसेल. त्या काळात वर्तमानपत्रे किंवा आजच्यासारख्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. त्या असत्या तर ‘आग्य्राहून सुटका’ हे थरारक नाट्य त्यांनी किमान वर्षभर चोवीस तास दाखवले असते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सोमवारी आग्रा येथे आले. आग्रा येथे बनत असलेल्या मुगल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणाच त्यांनी केली. देशाचा ‘महानायक’ मुगल कसा असू शकतो? तो हिंदुपदपातशहाच असू शकतो. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. उत्तर प्रदेशात गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना स्थान नाही हे त्यांनी दाखवून दिले. यामागे थोडी राजकीय विचारांची ठिणगी असायला हवी.


आंबेडकर कोणाचे?


उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाणे खणखणीत पद्धतीने वाजवले. आंबेडकर महाराष्ट्राचे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्रात राजकीय सूर्य उजाडत नाही, पण महाराष्ट्रात आंबेडकरवादी पक्षांनी स्वतःचे इतके अधःपतन आणि हसू करून घेतले की, ‘निवडणुकीत मते कापणारी मंडळी’ हीच त्यांची ओळख झाली आहे, असे आता जनतेचे मत बनले आहे. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना महाराष्ट्रात काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांपेक्षा जास्त मते पडतात. याउलट ‘आंबेडकरां’च्या विचारांचा वारसा सांगणारा, दीनदुबळय़ा दलितांना न्याय देणारा ‘आंबेडकरी पक्ष’ म्हणून मायावतींचा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर आला व राष्ट्रीय राजकारणातही स्थिरावला. आंबेडकर हे महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशच्या राजकारणात जाऊन स्थिरावले त्यास कारणे आहेत. इथला आंबेडकरी पक्ष महाराष्ट्राला शिव्या देणाऱ्य़ा ‘कंगना’ नावाच्या नटीच्या ‘झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला विमानतळावर पोहोचला. ज्या आंबेडकरांनी ‘‘मुंबई महाराष्ट्राचीच’’ असे ठणकावून सांगितले, त्या मुंबईस ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्य़ा नटीच्या स्वागतास ‘आंबेडकरी’ विचारांचा एक पक्ष पोहोचतो हा आंबेडकरांचा अपमान आहे. असे वैचारिक द्रोह कांशीराम यांनी केले नाहीत व मायावती यांनाही ते करता आले नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात डॉ. आंबेडकर त्यांना देवाप्रमाणे पावले. आता महाराष्ट्राचे दुसरे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आग्रा येथे भव्य म्युझियम, तेसुद्धा ‘मुघल’ नावावर फुली मारून निर्माण होत आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि रगारगात आहेत. मराठा आंदोलनाचे नेतृत्व स्वतः छत्रपती संभाजीराजे करीत आहेत. तरीही ‘अस्मिते’च्या प्रश्नावर छत्रपती शिवाजीराजांच्या नावाने सारा महाराष्ट्र आधी एकवटतो व मग राजकीय स्वार्थासाठी फुटतो हे दुर्दैव आहे!


स्वाभिमानाचे बंड…


आग्र्याचे महत्त्व शिवचरित्रात मोठे आहे. औरंगजेबाच्या आग्रा दरबारातील छत्रपतींचे बंड हे ‘मराठा’ स्वाभिमानाचे बंड होते. भर दरबारातील बंडानंतर शिवाजीराजांना संभाजीराजांसह कैद केले गेले. शके 1588 च्या श्रावण व. 12 रोजी औरंगजेबाच्या आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करवून घेतली. ‘‘बादशहाच्या कपटी कैदेतून सुटका होण्यासाठी सर्व उपाय थकल्यावर श्री शिवरायांनी एका अद्भुत प्रयोगास सुरुवात केली. त्यांनी आपले वर्तन साफ बदलले. ‘‘बादशहा सांगतील तसे आपण वागू’’ असे ते बोलू लागले. आपल्याबरोबरच्या मंडळींना बादशहाच्याच परवानगीने त्यांनी दक्षिणेत पाठवून दिले आणि आपण आजारी झाल्याची बतावणी सुरू केली. औषधांच्या व अनुष्ठान, शांती वगैरेंच्या निमित्ताने दररोज सायंकाळी त्यांनी ब्राह्मणांस व बैराग्यांस वाटण्याकरिता मिठाई पाठवण्याचा प्रघात सुरू केला. पहिल्या पहिल्याने पहारेकरी कसून तपासणी करीत, पण पुढे ही नित्याचीच गोष्ट झाल्यावर त्याची फिकीर कोण करतो? श्रावण व. 12 रोजी शिवरायांच्या नोकराने पहारेकऱ्य़ांना कळविले, ‘‘आज महाराजांस बिलकूल बरे वाटत नाही. गडबड करू नका.’’ मदारी मेहेतर, हिरोजी फर्जंद हे विश्वासू इसम सेवाशुश्रूषा करीत होते. संध्याकाळी हिरोजी फर्जंद शिवरायांच्या बिछान्यावर निजून राहिला. सोन्याचे कडे असलेला हात त्याने पांघरुणाबाहेर ठेवला व शिवराय आणि संभाजी कावडीच्या दोन टोपल्यांत बसले. कोणाही पहारेकऱ्य़ास संशय आला नाही. त्यांच्या कावडीबरोबर इतर कित्येक मिठाईच्या कावडी मागेपुढे होत्या. शहराबाहेर एकांत स्थळी शिवरायांची कावड येऊन पोहोचली. शिवाजी महाराज व संभाजी हे दोघे चालत चालतच सहा मैल दूर असणाऱ्य़ा गावात आले. तेथील रानात निराजी रावजी, दत्ताजी त्रिंबक, रघुमित्र आदी मंडळी घोडे सज्ज करून तयार होती. चटकन स्वार होऊन शिवाजी महाराज व संभाजी यांनी उत्तरेकडे मथुरेस प्रयाण केले.


दुसऱ्य़ा दिवशी पहारेकऱ्य़ांनी पांघरुणाबाहेरचा हात पाहिला. नोकर पाय चेपताना दिसला. त्यांना वाटले, शिवाजी बीमार आहे. हिरोजी व नोकर या दोघांनी पहारेकऱ्य़ांना सांगितले, ‘‘महाराज झोपले आहेत. आम्ही बाहेरून येतो.’’ आणि तेही निसटले. बराच वेळ झाला, काही सामसूम दिसेना तेव्हा पहारेवाले आत येऊन पाहतात तो काय, आत कोणीच नाही,’’ असे हे नाट्य अमर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post