जवळेत संतप्त महिलांचा बेमुदत उपोषणाचा इशारा महिला उपोषण करणार ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील जवळे येथील...
जवळेत संतप्त महिलांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
महिला उपोषण करणार ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा छडा लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या महिला आता आक्रमक झाल्या आहेत. मुलीचा दशक्रिया विधी झाल्यावर शुक्रवारपासून जवळे बसस्थानकासमोर महिला बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जवळे ग्रामस्थांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दशक्रिया विधी सार्वजनिक ठिकाणी,
बसस्थानकासमोर करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केला. जवळ्याच्या सरपंच अनिता आढाव, ग्रामपंचायत सदस्या सोनाली सालके, सामाजिक कार्यकर्त्या रंजना पठारे, गायत्री घावटे यांनी आक्रमक होत हत्येचा तपास लावण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर दबाव कायम ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला ग्रामस्थांनी पाठिंबा देत महिलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठबळ देण्याचे जाहीर केले.
आठ दिवसांपूर्वी जवळे येथील अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद रीत्या तिच्या घरात आढळला होता. त्यानंतर मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. गावातील सुमारे ३० ते ४० संशयितांची कसून चौकशी होऊनही गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नसल्याने पोलीस चुकीच्या दिशेने तपास करीत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी आक्रमकपणे केली आहे.
वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या घरी भरदिवसा पीडितेची हत्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मुलींचे पालक मुलींना शाळेत पाठवण्यास, घरी एकटीला सोडून शेतीच्या कामांसाठी, मोलमजुरीसाठी घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. गुन्ह्याचा छडा लागून आरोपींना अटक होईपर्यंत दहशत कायम राहणार आहे. आणखी किती दिवस दहशतीखाली वावरायचे असा प्रश्न या वेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला.
COMMENTS