अहमदनगर- जामखेड तालुक्यातील मंजूर झालेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा शुभारंभ यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मं...
अहमदनगर-
जामखेड तालुक्यातील मंजूर झालेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा शुभारंभ यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तसेच आमदार नितेश लंके, आ.संग्राम जगताप, आ.लहू कानडे आदींच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी स्थानिक आणि राज्यस्तरीय विविध मुद्यांना हात घालत टोलेबाजी केली. माजी आमदार राम शिंदे यांच्यावर बोलताना, जनतेने आता रोहितला निवडून दिलंय त्यामुळे आता तुम्ही शांत बसा, तुम्हाला जनतेने का नाकारले याचे आत्मचिंतन करा असा सल्ला दिला. रोहित चांगले काम करतोय तर त्यांचे कौतुक करा, आम्ही नाही का चांगले काम करणाऱ्या गडकरींचे तोंडभरून कौतुक करतो, तसे आता रोहितच्या कामाचे कौतुक करा आणि गमगुमान बसा असा टोला लगावला.
एफआरपी वरून पवारांनी एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांना चांगलेच सुनावले. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्याने अठ्ठावीसशे असा सर्वाधिक भाव दिलाय, इतर अनेक कारखाने अजून एफआरपी देईनात. काहींनी तर दोन वर्षांपासून एफआरपी थकवलेत. असे चालणार नाही. कारखान्यांनी चांगला एकरकमी एफआरपी तातडीने दिला पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या चिघळलेल्या आंदोलनाला हात घालत, एसटीचे कर्मचारी आपलेच बांधव आहेत. जनताही आपलीच आहे. त्यामुळे यातून मार्ग निघाला पाहिजे. या प्रश्नात आता शरद पवारांनी लक्ष घातले आहे असे सांगत या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा लवकरच निघेल असे सूचित केले.