जुन्या पिढीतील एक सृजनशील व सुसंस्कृत हिरा निखळला! किन्ही चे संयमी , मितभाषी , धुरंधर नेतृत्व माजी सरपंच शामराव " दादा " मुळे काळा...
जुन्या पिढीतील एक सृजनशील व सुसंस्कृत हिरा निखळला!
किन्ही चे संयमी , मितभाषी , धुरंधर नेतृत्व माजी सरपंच शामराव " दादा " मुळे काळाच्या पडद्याआड !
पारनेर/प्रतिनिधी :-
तालुक्यातील किन्ही - बहिरोबावाडी येथील माजी सरपंच व जुन्या पिढीतील एक अतिशय हुशार , शांत , संयमी , मितभाषी , तत्वनिष्ठ , प्रामाणिक व धुरंधर असं बहुआयामी व्यक्तिमत्व शामराव ( दादा ) माधवराव मुळे यांचे १६ नोव्हेंबर रोजी वृध्पकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. पारनेर तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागाचे उपाभियंता चंद्रकांत मुळे , पुणे जिल्ह्याचे कृषी अधिक्षक अधिकारी तथा महाराष्ट्र राज्याच्या आत्मा कमिटीचे संचालक आबासाहेब उर्फ किसनराव मुळे व सरला सुनिल पवार यांचे ते वडील व केंद्रीय राखीव पोलीस दलात डी.वाय.एस.पी.या पदावर कार्यरत असलेले संकेत चंद्रकांत मुळे यांचे ते आजोबा होते. स्व.शामराव मुळे हे किन्ही परिसरात " दादा " या नावाने ओळखले जातं ते उत्तम वक्ते देखील होते.जुन्या पठडीतील असुनही ते काळानुरूप बदल स्विकारून सर्वांशी जुळवून घेण्यात माहिर होते.
त्यांचे राहणीमान अतिशय साधं पण निटनेटकं असायचं पांढरा शुभ्र फेटा , नेहरू व धोतर असा त्यांचा नेहमीचा पेहराव असायचा त्यांच्या निधनाने किन्ही , बहिरोबावाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्व.शामराव माधवराव मुळे हे सामाजिक , शैक्षणिक , धार्मिक , राजकीय क्षेञात सदैव सक्रीय असतं सन - १९८० - ८५ च्या दशकात त्यांनी किन्ही - बहिरोबावाडी ग्रामपंचायत चे सरपंच पद देखील भुषविलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात गावातील विविध विकासकामे मार्गी लागली तसेच गावातील छोटे , मोठे वाद , विवाद ते आपल्या पातळीवरच मिटवून सदैव गावात सामाजिक सलोखा व शांतता कशी राहील याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत असे , गावामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू ओंकारबाबा माध्यमिक विद्यालयाच्या स्थापनेपासून तर विद्यालयास शासकीय मान्यता व अनुदान प्राप्त करून देण्यापर्यंतच्या संघर्षात व जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.
गावातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पारनेर येथे जावं लागतं असे त्यावेळी कॉलेज ला प्रवेश मिळण्यास कुणाला कधी अडचण आल्यास स्व.मुळे स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळुन देत असे , स्व.शामराव दादा मुळे यांच्यावर लहाणपणापासूनच कम्युनिस्ट विचारधारेचा प्रभाव होता त्यामुळे ते माजी आमदार स्व.बाबासाहेब ठुबे यांच्याबरोबर राजकारणात सदैव सक्रिय राहिले. हयातभर त्यांनी कधी कुणाचे मन दुखावले नाही , कुणासोबत कधी त्यांचा वाद देखील झाला नाही.ते सदैव राजकारणातील नव्या पिढीस वेळोवेळी मार्गदर्शन करीत असे , राजकारण व समाजकारण करत असताना नेहमी तोंडांत साखर व डोक्यावर बर्फ असावा असा वडिलकीचा सल्ला देखील ते न चुकता सर्वांना द्यायचे गावातील सर्व समाजाच्या सुख दुःखात ते सदैव सहभागी होतं होते. ते सामान्य शेतकरी कुटुंबातील असुन देखील त्यांनी प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या दोन्हीं मुलांना उच्च शिक्षण दिल्याने दोन्हीं मुलं आज शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत व त्यांचे देखील गावच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान राहिलेले आहे.
स्व.शामराव मुळे यांचा दशक्रीया विधी २५ नोव्हेंबर रोजी किन्ही येथे सोनार नदि तिरावर स. ८.०० वा.संपन्न होणार असुन , या वेळी ह.भ.प. गणेश महाराज उदापुरकर यांचे प्रवचन होणार आहे. स्व.मुळे यांच्या निधनाबद्दल पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके , माजी विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार विजयराव औटी , माजी जि.प.सदस्य आझादराव ठुबे , अण्णासाहेब हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे , माजी सरपंच मानसिंगराव देशमुख , माजी मंडलाधिकारी प्रभाकर खोडदे , उद्योजक नानासाहेब खोडदे , उद्योजक अरविंद खोडदे व किन्ही ग्रामपंचायत चे सरपंच , उपसरपंच सर्व सदस्य तसेच किन्ही - बहिरोबावाडी वि.का.से.स.सोसायटिचे चेअरमन , व्हा.चेअरमन सर्व संचालक व ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.स्व.शामराव ( दादा ) मुळे यांना किन्ही - बहिरोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली...!! व अखेरचा लाल सलाम...!!
शब्दांकन
-- अनिल देठे पाटील
( शेतकरी नेते तथा
राज्य सुकाणू समिती सदस्य )
मो. ९३५९०५०५५२
COMMENTS