टाकळी ढोकेश्वर परिसरात कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पारनेर/प्रतिनिधी : चालू वर्षी ढगाळ वातावरण व काही काळ आलेल्या पावसामुळे शेतमालाचे म...
टाकळी ढोकेश्वर परिसरात कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
पारनेर/प्रतिनिधी :
चालू वर्षी ढगाळ वातावरण व काही काळ आलेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कांदा पिकाला करपासदृश्य रोगाने ग्रासले आहे. सलग दोन वर्षे करोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असून यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिने हे थंडीचे महिने म्हणून ओळखले जातात परंतु निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यात कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ज्वारी पिकांवर चिकटा, मावा यांचे अतिक्रमण वाढत आहे. हरभरा पिकांवर किडे, तुडतुडे, घाटेअळी यांनी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पारनेर तालुक्यात चालूवर्षी अधूनमधून ढगाळ वातावरणाचा व अल्प प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. या बिगरमोसमी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजला आहे. शेतातील कांदा माना टाकून पडत आहे. पात जळत आहे. बिगर मोसमी पावसामुळे भाजीपाला पिके व फळपिके यांना मोठा फटका बसत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटून भाववाढीचा फटका सर्वसामान्यांनाही बसत आहे. खराब हवामानामुळे शेतकरी महागडी औषधे. फवारण्या करून मेटाकुटीला आला आहे. अगोदरच महागडी बियाणे, खते, औषधे खर्च करून पीक काढणीला आले असताना हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे मातीमोल होत आहे. रात्रीचा दिवस करून जगवलेला कांदा बाजारपेठेत नेला असता झालेला खर्च देखील वसूल होताना दिसत नाही.
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिरायती पट्टयात कांदा हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मात्र ढगाळ वातावरण व अतिवृष्टीमुळे काढलेला कांदा शेतातच भिजला तर काढणीस आलेल्या कांदा पिकाला पाण्याची गरज नसतानाही अवेळी पाऊस झाल्याने कांदा पिक हे शेतातच सडू लागले असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गाला सरकारकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे.
प्रकाश गाजरे (सरपंच, म्हसोबा झाप)
.
COMMENTS