पारनेर नगरपंचायतीमध्ये बहुरंगी लढत? राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा ! विरोधकांची आघाडी बिघडण्याची शक्यता आघाडी की पक्षाचे चि...
पारनेर नगरपंचायतीमध्ये बहुरंगी लढत?
राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा !
विरोधकांची आघाडी बिघडण्याची शक्यता
आघाडी की पक्षाचे चिन्ह, याबाबत इच्छुकांत संभ्रम
जागा वाटपात एकमत होण्याची चिन्हे दिसेनात
अपक्ष उमेदवारी करून अनेक जण नशीब अजमावणार
पारनेर प्रतिनिधी : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास काल पासून सुरुवात झालो. आमदार नीलेश लंके यांनी १७-० चा नारा दिल्यानंतर काही शिवसैनिकांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणत विरोधकांना खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे स्थानिक विकास आघाडी, भाजप-शिवसेना असे मिळून आघाडी करण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू झाला. मात्र, जागावाटपात एकमत होत नसल्याने प्रत्येक जण स्वबळाचा नारा देत आहे. राज्यात महाविकास आघाडी असली, तरी तालुक्यात दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.
पारनेर नगरपंचायत ताब्यात घेऊन तालुक्याच्या राजकारण्यांवर एक हाती सत्ता मिळविण्याचा आमदार लंके यांचा प्रयत्न आहे. विरोधी गटाकडून माजी आमदार विजय औटी, जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जि. प. बांधकाम सभापती काशीनाथ दाते, जि. प. माजी उपाध्यक्ष व भाजप नेते सुजित झावरे, भाजप तालुकाध्यक्ष वसंत चेडे, नगरसेवक व स्थानिक आघाडी प्रमुख चंद्रकांत चेडे हे कोणती भूमिका घेतात व निवडणूक एकत्र लढण्याबाबत यांच्यात एक विचार होतो का?
याबाबत मतदारांप्रमाणेच इच्छुकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना-भाजप व स्थानिक आघाडी या तिघांकडे इच्छुकांची भाऊगर्दी हीच निवडणूक एकत्र लढण्यासाठी अडचण ठरत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार लंके यांनी मोठे आव्हान उभे केल्यामुळे विरोधकांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्व प्रकार अजमावून पाहिले जात आहेत अखेर राष्ट्रवादी विरोधक एकत्र न आल्यास निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फायदा कोणाला होईल, ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादी व शिवसेना हे आघाडीत असलेले दोन्ही मुख्य पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याचे चित्र आहे. भाजप, स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत निर्णय न झाल्याने या पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये निवडणुका नेमक्या कोणत्या चिन्हावर लढविल्या जाणार याबाबत संभ्रम आहे. राज्यात महाविकास आघाडी असली,तरी पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजप, स्थानिक विकास आघाडीसोबत जाणार आहे.
COMMENTS