अवकाळीची नुकसानभरपाई द्या प्रशांत गायकवाड यांची अजित पवार, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी पारनेर/प्रतिनिधी : दि. १ डिसेंबर ते ५ डिस...
अवकाळीची नुकसानभरपाई द्या
प्रशांत गायकवाड यांची अजित पवार, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी
पारनेर/प्रतिनिधी :
दि. १ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण पारनेर तालुक्यात अवकाळी पाऊस होऊन खरीप हंगामातील विशेषतः कांदा या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी कांदा हे प्रमुख आर्थिक उत्पन्नाचे पिक असून त्यावरच शेतकऱ्याचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते.
अवकाळीमुळे हे पिक हातचे गेल्याने शेतकऱ्याचे वर्षीक आर्थिक नियोजन संकटात सापडले असून शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचानामे करून त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी पारनेर बाजार समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यंदा पारनेर तालुक्यात ८ ते ९ हजार हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झालेली आहे. सुरूवातीच्या काळात सर्वच भागात कांद्याचे पिक जोमदार होते. गेल्या सात आठ दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे, रोग पडल्याने कांद्याचे पिक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याच्या हाती उत्पादन खर्चाच्या पाच टक्केही रक्कम मिळणे दुरापास्त होणार आहे.
शेतकऱ्यांनी एक हेक्टर कांद्याच्या लागवडीसाठी १ लाख रूपयांपर्यंत खर्च केलेला आहे. खाजगी सावकार तसेच इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन हा खर्च करण्यात आलेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होण्याची भिती आहे. या आपत्तीमुळे फळबागा व इतर नगदी पिकांचेही मोठे नुकसान झालेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन त्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई मिळणे अत्यंत आवष्यक आहे. तालुक्यातील अनेक मेंढपाळांच्या मेंढयाही या कालावधीत थंडीमुळे गारठून मरण पावल्या आहेत. या मेंढपाळ बांधवांनाही शासनामार्फत मदत मिळणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पिक विमा भरलेला आहे. त्यांना सबंधित विमा कंपनीकडून पुर्णपणे लाभ मिळणे आवष्यक आहे. यासंदर्भात पारनेर नगर - मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनीही शासनस्तरावर सबंधित विभागांकडे योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला असल्याचे गायकवाड यांनी या निवेदनात नमुद केले आहे.