आमदार निलेश लंके दूध संघाच्या कर्मचाऱ्यांसाठी आले धावून कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे; आमदार लंके यांची यशस्वी मध्यस्थी पारनेर/प्रतिनिधी :...
आमदार निलेश लंके दूध संघाच्या कर्मचाऱ्यांसाठी आले धावून
कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे; आमदार लंके यांची यशस्वी मध्यस्थी
पारनेर/प्रतिनिधी :
कर्मचाऱ्यांची सेवा पूर्ववत कायम करावी तसेच उपदान प्रॉव्हिडंट फंड मिळावा, कामबंद भरपाई द्यावी, संघाच्या जागा विक्रीच्या शिल्लक निधीतून कर्मचाऱ्यांची देणी थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसलेल्या नगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या कर्मचाऱ्यांसाठी आमदार निलेश लंके धावून आले. त्यांनी संघाचे अध्यक्ष व संचालकांशी चर्चा करुन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात २७३ कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी तायगा शिंदे, गजानन खरपुडे, कुंडलिक देवकर, एकनाथ कोतकर, किरण थोरात, भाऊ चितळकर, अरुण वाकळे, आप्पासाहेब ढवळे, रमेश वायकर रावसाहेब तांबे, संभाजी निमसे, दत्तात्रेय पानसंबळ, एकनाथ कराळे, बाबा चतुर
आदी उपस्थित होते. संघाच्या २७३ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कोणताही निर्णय घेतला जात नव्हता. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण चालू केले होते. ही माहिती समजल्यानंतर आमदार लंके थेट उपोषणस्थळी पोहोचले. दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. याबाबत कर्मचाऱ्यांना संघाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
तायगा शिंदे व गजानन खरपुडे यांना पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले. तसेच फंडाचा २५ लाखांचा चेक लंके यांच्या उपस्थितीत भरणा करण्यास देण्यात आला. दूध संघाचे सनदी लेखापाल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन घेऊन कार्यालयाची मंजुरी घेऊन न्यायालयीन आदेशाप्रमाणे निर्णय घेण्यात येईल तसेच प्रॉव्हिडंट फंड भरणा नोटीस प्राप्त असून याबाबत नियमाप्रमाणे भरणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन संघाच्या वतीने देण्यात आले.