स्वातंत्र्यवीरांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये : अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे शांतिनिकेतन मैदानावर झालेल्या ध्वजारोहण समारंभात सहभाग पारनेर प्रति...
स्वातंत्र्यवीरांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये : अण्णा हजारे
राळेगणसिद्धी येथे शांतिनिकेतन मैदानावर झालेल्या ध्वजारोहण समारंभात सहभाग
पारनेर प्रतिनिधी :
आमच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठे बलिदान झाले आहे. प्रत्येकाने त्याची आठवण ठेवली पाहिजे. तरच देशात खरे प्रजासत्ताक प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे शांतिनिकेतन मैदानावर झालेल्या ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आज सकाळी आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे ग्रामपंचायत कार्यालय, डीबीएम इंग्लिश मीडियम स्कूल, प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या सर्व ठिकाणी अण्णा उपस्थित होते.
सर्वात शेवटी संपूर्ण गावच्या वतीने अण्णांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सरपंच लाभेष औटी व माजी सरपंच जयसिंग औटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव मापारी, संचालक संपत पोटे, गंगाराम मापारी, निवृत्ती मापारी, नानाभाऊ औटी, यादव गायकवाड, नानाभाऊ औटी, उपसरपंच अनिल मापारी, मंगल मापारी, संपत उगले, प्राचार्य दिलीप देशमुख, पर्यवेक्षक भाऊ धावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अण्णा म्हणाले, की बलिदानाची आठवण राहिली नाही म्हणून या देशाची ही अवस्था झाली. भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे अनेक वेळा जनआंदोलन करावे लागले. त्यातून जनहिताचे दहा कायदे झाले. भ्रष्ट लोकांवर अंकुश निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी संविधान, माहितीचा अधिकार यांचा अभ्यास केला पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगीचे नाही. तर त्याबरोबरच आपण देशाचे एक जबाबदार नागरिक बनले पाहिजे.