वेब टीम : दिल्ली कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय कामगारांसाठी महाराष्ट्रापेक्षा सर्वाधिक रेल्वे गाड्या गुजरातमधून चालवण्यात आल्या, असा द...
वेब टीम : दिल्ली
कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय कामगारांसाठी महाराष्ट्रापेक्षा सर्वाधिक रेल्वे गाड्या गुजरातमधून चालवण्यात आल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी केला. यासाठी त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री व अन्य मंत्र्यांचा संदर्भही दिला.
देशभर कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केला होता. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रेल्वेचे नियंत्रण केंद्र सरकारकडेच होते. त्यांनीच रेल्वे सुरू केली होती, असे सांगत स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान काँग्रेसवर खापर फोडत असल्याची टीका केली होती.
महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान जे बोलले त्याचे मला दुःख वाटते. महाराष्ट्राने भाजपला 18 खासदार निवडून दिले. मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोव्हिड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे, असे सुप्रिया यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
त्याचवेळी पंतप्रधानांचा मुद्दा खोडून काढताना कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतरित कामगारांसाठी गुजरातमधून सर्वाधिक 1 हजार 33 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या. तर, महाराष्ट्रातून 817 रेल्वे गाड्या चालवल्या गेल्या, असेही सुळे म्हणाल्या. यासाठी त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या 2020 च्या सोशल मीडिया पोस्टचाही संदर्भ दिला. ज्यांनी स्थलांतरित कामगारांसाठी रेल्वेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते.