प्रेमप्रकरणात धोका; रायतळे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या पारनेर/प्रतिनिधी : प्रेमप्रकरणात मुलीने धोका दिला म्हणून पारनेर तालुक्यातील र...
प्रेमप्रकरणात धोका; रायतळे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पारनेर/प्रतिनिधी :
प्रेमप्रकरणात मुलीने धोका दिला म्हणून पारनेर तालुक्यातील रायतळे येथील संजय सुखदेव पवार (वय २०) या तरुणाने हंगा-शहाजापूर रोडवरील वनविभागाच्या जंगलात फाशी घेऊन आत्महत्या केली. या तरुणाने फाशी घेण्याअगोदर सोशल मीडियावर फाशी घेणार असल्याचा व्हिडिओ टाकला होता. याबाबत रामदास नामदेव साळुंके यांनी सुपा पोलीस स्टेशनला माहिती दिली. संजय पवार यांनी मोबाईलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मी फाशी घेणार आहे, असा व्हिडिओ टाकला.
तो व्हिडिओ साळुंके यांनी पाहून सुपा पोलिसांना माहिती दिली. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पोलीस हवालदार ओहळ यांनी शोध घेतला असता हंगा- शहाजापूर रोडवरील वन विभागाच्या जंगलात संजय पवार याने फाशी घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
या युवकाने व्हिडिओमध्ये प्रेमप्रकरणात मुलीने धोका दिला म्हणून आत्महत्या करत आहे, असे म्हटले आहे. आणखी कुठल्या नैराश्यातून आत्महत्या केली का, याचाही तपास सुपा पोलीस करत आहे.