टँकर घोटाळ्यातील तिघा संचालकांना राळेगणसिद्धीच्या पदांवरून दूर करा लोकजागृती संस्थेची मागणी: अण्णा हजारेंनी ग्रामसभा घ्यावी अहमदनगर प्रतिनिध...
टँकर घोटाळ्यातील तिघा संचालकांना राळेगणसिद्धीच्या पदांवरून दूर करा
लोकजागृती संस्थेची मागणी: अण्णा हजारेंनी ग्रामसभा घ्यावी
अहमदनगर प्रतिनिधी :
टँकर घोटाळ्यात अडकलेल्या साई सहारा इन्फ्रा अॅण्ड फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे तीन संचालक राळेगणसिद्धी गावातील असून, ते गावच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे या तिघांचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत त्यांना पदांवरून दूर करावे तसेच त्यांची निष्पक्षपणे चौकशी करावी, या घोटाळ्याशी अण्णा हजारे यांचा काहीही संबंध नाही, असे ठराव ग्रामसभेत करून शासनाला पाठवावेत अशी मागणी लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे व सचिव बबन कवाद यांनी याबाबत राळेगणसिद्धीचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे, लोकजागृती या संस्थेने दोन वर्षापूर्वी पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. शासनाने या
तक्रारीची दखल घेऊन चौकशी समिती नेमून तो अहवाल पोलिसांमार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केला होता. त्यानुसार उच्च न्यायालयाने पोलिसांना योग्य त्या कारवाईचे आदेश दिले होते. अहवालातील निष्कर्षांनुसार व पोलिसांच्या प्राथमिक तपासावरून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांनी साई सहारा इन्फ्रा अॅण्ड फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या साई सहारा या कंपनीत राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील तीन संचालक तर इतर आपल्या तालुक्यातील आहे. कंपनीचे तीन संचालक राळेगणसिद्धीतील असल्याने व ते गावातील विविध पदांवर कार्यरत असल्याने त्यांचा पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्याभोवती सतत वावर असतो. आता त्यांच्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राळेगणसिद्धी परिवार व अण्णासाहेब हजारे यांचे नाव या घोटाळ्याशी जोडले जात आहे. ते चुकीचे असून, त्याबाबत राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत चर्चा करून या घोटाळ्याशी अण्णांचा काही संबंध नसल्याचा ठराव घेण्यात यावा व शासनाला पाठवण्यात यावा, गुन्हा दाखल झालेल्या
कंपनीच्या संचालकांचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत गावातील विविध पदांवरून त्यांचे राजीनामे घेण्यावर ग्रामसभेत चर्चा करावी. साई सहारा या कंपनीवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा सखोल व निष्पक्ष तपास होण्याची मागणी करणारा ठराव घेऊन तो प्रशासनास पाठवण्यात यावा. या घोटाळ्याबाबत ग्रामसभेत चर्चा व्हावी, अशी मागणी घावटे व कवाद यांनी केली आहे.