पळशी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? राष्ट्रवादी प्रणित सत्ताधारी गटासमोर विरोधी गटाचे तगडे आव्हान सत्ता मिळाल्यास पळशी सेवा सो...
पळशी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?
राष्ट्रवादी प्रणित सत्ताधारी गटासमोर विरोधी गटाचे तगडे आव्हान
सत्ता मिळाल्यास पळशी सेवा सोसायटी राज्यात डिजिटल करणार
शेतकरी ग्रामसहकार पॅनलचे प्रमुख गणेश हाके
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पळशी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक उद्या होत असून या निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराची राळ उठवली आहे. एकूण १३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटासमोर श्री मलवीर शेतकरी ग्रामसहकार परिवर्तन पॅनेलने आव्हान उभे केले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी प्रणित श्री मलवीर बळीराजा ग्रामविकास सहकार पॅनल विरुद्ध सर्वसामान्यांचा श्री मलवीर शेतकरी ग्राम सहकार परिवर्तन पॅनल हा रिंगणात एकमेकांच्या समोर उभे असून या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या विरोधात तगडे आव्हान उभे राहिले आहे.
श्री मलवीर शेतकरी ग्रामसहकार परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व युवा नेते अमोल साळवे, गणेश हाके, मिठू जाधव, रवींद्र शिंदे, गोट्या गागरे, संतोष जाधव, रामचंद्र जाधव, गणेश शिंदे, सीताराम साळवे, हे करत असून तर आमदार निलेश लंके गटाचा राष्ट्रवादी प्रणित सत्ताधारी श्री मलवीर बळीराजा ग्राम विकास सहकार पॅनलचे नेतृत्व आमदार निलेश लंके गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव ऍड. राहुल झावरे, पळशीचे उपसरपंच आप्पासाहेब शिंदे, गणेश मधे, संकलेश मोढवे हे करत असून ही निवडणूक पळशी गावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी मिळण्यासाठी निवडणूक चुरशीची होत असून उमेदवारांनी प्रचाराची धूम उडवली आहे. निवडणूक प्रतिष्ठेची करून उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. मतदारांना विकासाचे शब्द निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांकडून देण्यात येत आहे.
श्री मलवीर शेतकरी ग्रामसहकार परिवर्तन पॅनेलने या निवडणुकीत प्रचारामध्ये बाजी मारल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांची ताकद पाठीमागे असल्यामुळे सत्ताधार्यांना धूळ चारण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. सहकार जिवंत राहिला पाहिजे सहकार टिकला पाहिजे ही भावना मनात ठेवून उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी गटाला शह देण्यासाठी व सहकार बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच पळशी विविध कार्यकारी सेवा सोसायटी डिजिटल सोसायटी तयार करून राज्यात आदर्श सोसायटी तयार करणार असल्याचे तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच कृषी योजना शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सत्ता ताब्यात आल्यानंतर प्रयत्न करणार. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे पॅनल प्रमुख युवा नेते गणेश हाके युवा नेते अमोल साळवे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान चुरशीची निवडणूक होत असल्याने पळशी सेवा सोसायटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक कोणासाठी अस्तित्वाची ठरणार हे येणारा काळच सांगेल. तालुक्यातील पळशी सेवा सोसायटी ही अशी एकमेव सोसायटीची निवडणूक असून या निवडणुकीत युवक नेतृत्व एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचे दिसून येते.