बिबट्याच्या हल्ल्यात ५ मेंढ्यांचा मृत्यू; पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे घडली घटना पारनेर/प्रतिनिधी : बुधवारी रात्री सुरू असलेल्...
बिबट्याच्या हल्ल्यात ५ मेंढ्यांचा मृत्यू; पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे घडली घटना
पारनेर/प्रतिनिधी :
बुधवारी रात्री सुरू असलेल्या रिमझिम पावसात बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये ५ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि २२) मध्यरात्री पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे घडली.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके हे आपल्या पाळीव शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजिक शेतात रात्रीच्या मुक्कामास होते. बुधवारी सांयकाळ पासून पावसाची रिमझिम सुरूच होती. पहाटेपर्यंत ही रिमझिम सुरूच होती. रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे देखील आडोशाला बसले असल्याने अज्ञात वन्य प्राण्याने या कळपावर हल्ला केला.
शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने व कुत्रे भुकायला लागल्याने हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला. अंधार असल्याने हल्ला करणारा वन्य प्राणी हा बिबट्या असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. यामध्ये ५ पाळीव मेंढ्या जखमी होऊन मृत्यमुखी पडल्या. सुमारे ३० ते ३५ हजारांची नुकसान शेतकऱ्याची झाली असून तातडीने शासनस्तरावरून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ झावरे व वनविभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला.
एकीकडे पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट पडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी सरपंच सुरेश काळे यांनी व्यक्त केले.