बळीराजाला पेरणीची; तर पुढाऱ्यांना निवडणुकीची चिंता ! गणेश जगदाळे/पारनेर जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या...
बळीराजाला पेरणीची; तर पुढाऱ्यांना निवडणुकीची चिंता !
गणेश जगदाळे/पारनेर
जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी गट- गणांचा प्रारूप आराखडा दि. २ जून रोजी प्रसिद्ध झाला नवीन रचनेनुसार अनेक ठिकाणी गट आणि गणांमध्ये मोठे बदल झाल्याने, राजकीय नेत्यांची धावपळ पाहावयास मिळत आहे.
पारनेर तालुक्यात मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत सामितीचे १० गण अस्तित्वात होते. आता नवीन रचनेनुसार आगामी निवडणुकीसाठी जि.प. १ गट व पं.स. चे २ गण वाढले असून, काही ठिकाणी गणातील गावांमध्ये अदलाबदल झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलणार असल्याने, राजकीय नेते मतदारांना भेटण्याची कुठलीच संधी सोडताना दिसून येत नाहीत. ऐनवेळी निवडणुकीत होणारी धावपळ टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते मतदारांच्या भेटीगाठी मध्ये व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
दुसरीकडे खरीप हंगाम सुरु झाल्यामुळे व तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त असून, बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत लगबग दिसून येत आहे. सध्या कांदा बियाणे चढ्या भावाने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच मान्सून अजून समाधानकारक नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या चर्चा गावच्या पारांवर रंगू लागल्या असून, सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आपले पक्ष संघटन बळकट करताना दिसून येत आहेत. पारनेर तालुक्यात आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचा १ गट व पंचायत समितीचे २ गण नव्याने तयार होत असल्याने तालुक्यातील सर्वच गट व गणांमध्ये फेररचना होऊन नवीन जवळा जिल्हा परिषद गट अस्तित्वात आला आहे. आता तालुक्यात एकूण ६ गट व १२ पंचायत समिती गण हे नवीन रचनेनुसार अस्तित्वात आल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसते.
त्यामुळे नवीन गट रचनेनुसार काहींना फायदा तर काहींना हा बदल डोकेदुखी ठरणारा आहे. मात्र, आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने, राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक आरक्षण सोडतीकडे डोळे लावून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.