प्रतिनिधी : नगर शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या या पक्षात उद्धव ठाकरे ...
प्रतिनिधी : नगर
शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या या पक्षात उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून कायम सर्वसामान्यांना न्याय दिलाय. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी समर्थपणे पेलताना सामान्य कार्यकर्त्यांनाही त्यांनी नेहमीच जपले. त्यामुळे कितीही बंड झाले, कितीही आमदार गेले, तरी आम्ही नगरचे शिवसैनिक कायम उद्धव ठाकरे बरोबरच आहोत, अशा शब्दात शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी भूमिका मांडली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. मात्र, असे अनेक बंड शिवसेनेने समर्थपणे पचवलेत. या बंड करणाऱ्यांची नंतरच्या काळात काय अवस्था होते, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले शिवसेनेचे रोपटे आज शिवसैनिकांसाठी वटवृक्ष झालेला आहे. सामान्य कार्यकर्त्याला मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पदापर्यंत संधी दिली. शिवसेनेने अनेकांना मोठे केले. शिवसैनिकांना कायम ताकद देण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. आज काही मंडळी शिवसेना संपवण्याचा डाव आखत आहेत. त्यांच्या प्रलोभनांना भुलून काही सत्तापिपासू आमदारांनी पळ काढला आहे. मात्र, शिवसेना हा एक विचार आहे आणि शिवसैनिक या विचारांशी बांधील आहेत. त्यामुळे आम्ही नगरचे सर्व शिवसैनिक व पदाधिकारी कायम शिवसेनेसोबत व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत व यापुढेही राहणार आहोत, असे लहामगे यांनी स्पष्ट केले.
COMMENTS