हरेश्वर मंदीरातील दानपेटी पुन्हा फोडली; तिसऱ्यांदा चोरी पारनेर प्रतिनिधी : कर्जुलेहर्या ग्रामस्थांचे आराध्य दैवत हरेश्वर महाराजांच्या मंदीर...
हरेश्वर मंदीरातील दानपेटी पुन्हा फोडली; तिसऱ्यांदा चोरी
पारनेर प्रतिनिधी :
कर्जुलेहर्या ग्रामस्थांचे आराध्य दैवत हरेश्वर महाराजांच्या मंदीरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील नऊ हजार रूपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दानपेटीची चोरी होण्याची ही तिसरी घटना आहे.
दि. १२ जुन रोजी रात्री १२ वाजून १० मिनिटांपासून सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सभामंडपासमोर ठेवण्यात आलेल्या पिवळया रंगाची दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील नऊ हजार रूपयांची रक्कम चोरून नेली, मंदीराचे सफाई कर्मचारी अनिल भाउसाहेब कुटे ( रा. कर्जुलेहर्या ) हे सकाळी सहा वाजता साफसफाई करण्यासाठी मंदीरात गेले असता दानपेटीचे कुलूप नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर ग्रामस्थांच्या सुचनेनुसार पारनेर पोलिस ठाण्यात जाऊन कुटे यांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली. दि. १२ रोजी रात्रीच्या वेळी पाऊस सुरू होता. त्याचा फायदा घेत चोरटयाने मंदीरात जाऊन दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील पैशांवर डल्ला मारला. मंदीर परिसरात काम सुरू असल्याने तेथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे चोरटयाचा शोध घेण्यासाठी पोलिसांना इतर ठिकाणच्या फुटेजचा आधार घ्यावा लागणार आहे. पोलिसांच्या मते चोरटा हा कर्जुलेहर्या किंवा परिसरातील माहीतीगार असण्याची शक्यता असून तशाच पध्दतीने तपास करण्यात येत आहे.
यापूर्वी मंदीरातील दानपेटी चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. एका चोरी प्रकरणात ट्रक चालक व मदतनिसास चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. दानपेटी चोरून नेऊन त्यातील रक्कम काढल्यानंतर आणे घाटत दानपेटी फेकून देण्यात आली होती. प्रभारी पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक थोरात हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, रक्तचंदन तसेच गारगोटीच्या तस्करीमुळे चर्चेत असलेले कर्जुलेहर्या हरेश्वर मंदीरातील दानपेटीचे कुलूप तोडून रक्कम लांबविली गेल्याने पुन्हा चर्चेत आले आहे.