अण्णा हजारेंच्या संस्थांचा माहिती देण्यास नकार माहिती अधिकार कायदा लागू नसल्याचा दावा पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील...
अण्णा हजारेंच्या संस्थांचा माहिती देण्यास नकार
माहिती अधिकार कायदा लागू नसल्याचा दावा
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संचलित काही सार्वजनिक संस्थांनी आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नसल्याचे पत्र पाठवून माहिती देण्यास नकार कळवला असल्याची घटना नुकतीच घडली आहे . याबाबतची अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास , स्वामी विवेकानंद कृतज्ञता ट्रस्ट, हिंद स्वराज ट्रस्ट व आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था यांच्याकडे माहिती मागवली होती . परंतु या चारही संस्थांनी आमच्या संस्थांना शासकीय अनुदान प्राप्त होत नसल्याने माहिती अधिकार कायदा २००५ चे प्रकरण २ मधील पोट ( कलम ३ ' ज ' ) नुसार आम्ही या कायद्याच्या कक्षेत बाहेर असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचे कळवले आहे .
याशिवाय येथील ग्रामपंचायत कार्यालय व
श्री . संत यादवबाबा शिक्षण प्रसारक संस्थेकडेही माहीती मागविण्यात आली आहे . एखाद्या संस्थेला किंवा शासकीय आस्थापनेला माहिती
नाकारायची असेल तर माहिती मागणाऱ्याला तसे पत्र पाठवून नकार देण्याची कायद्यात तरतूद आहे . व नकार देताना आपण यावर समाधानी नसाल तर अपिल दाखल करण्याची मुभा देखील ठेवली जाते . , परंतु या संस्थांकडून मिळालेल्या पत्रात अपिलाची देखील संधी देखील ठेवण्यात आलेली नाही . परंतु , तरीही देखील अपिल दाखल करण्यात आलेले आहे . लवकरच या अपिलावर सुनावणी होणार असल्याचे घावटे यांनी सांगितले .
माहीती अधिकाराचे जनक असणारे व देशभर भ्रष्टाचार मुक्ती व पारदर्शकतेचा डांगोरा पिटणारे अण्णा हजारे यांनीच त्यांच्या संस्थांची माहिती नाकारून माहीती अधिकार कायद्याला हरताळ फासला आहे . माहितीचा अधिकार कायदा सर्वात प्रथम अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात लागू करण्यात आला होता . त्यानंतर केंद्र सरकारने तो देशभर लागू केला होता . गेल्या काही वर्षांपासून माहिती अधिकार कायद्यामुळे शासन - प्रशासन , वित्तीय व सार्वजनिक संस्था यांच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी मदत झाली आहे . परंतु आता हा कायदा करायला भाग पाडणारे अण्णा हजारे यांनाच तो नकोसा वाटू लागला असल्याचे घावटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .
संशय बळावला .... !
पारनेर पोलिस ठाण्यात फसवणूकिचा गुन्हा दाखल झालेले टँकर घोटाळ्यातील आरोपी हे राळेगणसिद्धीतील आहेत व त्यातील काहीजन अण्णा हजारे यांच्यासोबत या संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत . टँकर घोटाळ्यातील अपहाराची काही रक्कम या संस्थांमध्ये वळती झाली असल्याचा आम्हाला संशय आहे. तसेच माहीती मागवलेल्या सहकारी पतसंस्थेमध्ये आरोपींचे दैनंदिन आर्थिक व्यवहार व कर्ज प्रकरणे असल्याचे समजते . त्यामुळे आम्ही ही माहिती टँकर घोटाळ्याशी संबंधीत पुरावे मिळवण्यासाठी मागवली होती , परंतु ती देण्यात आलेली नाही त्यामुळे याबाबतचा आमचा संशय आता अधिक बळावला आहे .
रामदास घावटे
माहिती अधिकार कार्यकर्ते