आमदार नीलेश लंके यांनी वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत दोन तास थांबले दवाखान्यात नाशिक प्रतिनिधी : सिन्नर -नाशिक महामा...
आमदार नीलेश लंके यांनी वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण
रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत दोन तास थांबले दवाखान्यात
नाशिक प्रतिनिधी :
सिन्नर -नाशिक महामार्गावर एल अँड टी फाट्याजवळ ट्रकने धडक दिलेल्या दुचाकीचालकास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी रुग्णवाहिकेची वाट न बघता आपल्या वाहनाने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. गुरुवारी (दि.१४) दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांच्या समवेत ते दोन तास रुग्णालयात थांबून होते.
निफाड तालुक्यातील धारणगाव (वीर) येथील कल्याण शिवाजी सानप (४२) हे आपल्या दुचाकीने नाशिकहून येत असताना एल अँड फाटा परिसरात समोरुन येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात सानप यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला. यावेळी नाशिकहून पारनेरला जात असलेले आमदार निलेश लंके हे पाठीमागून येत होते. अपघात झाल्याचे बघताच यांनी आपले वाहन थांबवत दुचाकीचालकाला धीर दिला. यावेळी आमदार लंके यांनी सिन्नर येथील माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांना फोन करुन अपघाताची माहिती दिली. देशमुख यांना सिन्नरमधील चांगल्या रुग्णालयाची विचारपूस करुन लंके यांनी अपघातग्रस्ताला आपल्या वाहनामध्येच टाकत थेट रुग्णालयात आणले.
देशमुख हेही तात्काळ रुग्णालयात पोहचवत त्यांनी अपघातग्रस्ताला उपचारासाठी दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. यावेळी लंके हे संपूर्ण उपचार होवून अपघातग्रस्ताला शुद्ध येईपर्यंत जवळपास २ तास रुग्णालयात थांबून असल्याचे बघायला मिळाले. नंतर रुग्णाच्या तब्बेतीची चौकशी करुन त्यांनी त्याचा निरोप घेतला.