हंगे शिवारात मोटरसायकल अज्ञात चोराने लांबवली तालुक्यात मोटरसायकल चोरीचे सत्र थांबेना पारनेर/प्रतिनिधी : पारनेर सुपे रस्त्यावर हंगे शिवारात ...
हंगे शिवारात मोटरसायकल अज्ञात चोराने लांबवली
तालुक्यात मोटरसायकल चोरीचे सत्र थांबेना
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर सुपे रस्त्यावर हंगे शिवारात औद्योगिक वसाहत परिसरातील नवाज हॉटेलसमोर लावण्यात आलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. हाकेच्या अंतरावर सुपे पोलिस ठाणे असताना तसेच या रस्त्यावर नेहमीच रहदारी असताना तेथूनही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तालुक्याच्या विविध भागांतून मोटारसायकल चोऱ्यांच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.
रवनसिंग ओमसिंग (वय २९ रा. जुग्गे छिछीया, ता. गुरुहरसाय, जि. सोलापूर, पंजाब हल्ली रा. हंगे शिवार), नवाज हॉटेलच्यावर सुपे पारनेर रस्त्यावर हे सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीस असून नवाज हॉटेलच्या वरील खोल्यांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी दि. २८ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नवाज हॉटेलसमोर आपली स्प्लेंडर मोटारसायकल लाउन ते खोलीमध्ये जाऊन झोपले होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उठून त्यांनी आपली मोटारसायकल रात्री लावण्यात आलेल्या जागेवर आहे का ? याची पाहणी केली असता त्या जागेवर मोटारसायकल आढळून आली नाही.
रवनसिंग यांनी परिसरात शोध घेतला. ओळखीतील मित्रांकडेही चौकशी केली, मात्र मोटारसायकल मिळून आली नाही. त्यानंतर दि. १ रोजी त्यांनी सुपे पोलिस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली. रवनसिंग यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. ओहळ हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, नगर जिल्हयासह पारनेर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वारंवर घडत आहेत. पारनेर, सुपे पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेकदा मोटारसायकल चोरांचे रॅकेट उघडकीस आणले तरीही चोऱ्या थांबण्याचे नाव घेत नाहीत.