कांद्याचे दर काय वाढेना अन् बळीराजाची चिंता मिटेना ! कांदा वखारीत खराब होण्याचे प्रमाण वाढले पारनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कांदा शिल्ल...
कांद्याचे दर काय वाढेना अन् बळीराजाची चिंता मिटेना !
कांदा वखारीत खराब होण्याचे प्रमाण वाढले
पारनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक
गणेश जगदाळे/पारनेर :
पावसाळा चालू होऊन दोन महिने झाले तरी कांदा पंधरा रुपयांच्या पुढे जात नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. महिन्या दोन महिन्यांत नवीन लाल कांदा बाजारात येण्याची वेळ असते. तर वखारीतील कांदाही खराब होऊ लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
साधारणपणे मार्च एप्रिल मे महिन्यात काढलेला गावरान कांदा शेतकरी बाजारभाव नसल्याने वखारीत साठवून ठेवतात आषाढ महिन्यात आवक मंदावल्यावर कांद्याचे बाजार वाढतात. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात काढलेला कांदा जुलै अँगस्ट महिन्यात याची विक्री करतात. परंतु या वर्षी आषाढ महिना संपला तरी कांदा १५ रुपये किलोच्या पुढे गेला नाही.
याबाबत पारनेर बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले की, आज रोजी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत १० ते १५ रुपये दराने कांदा विकला जात असून मागील महिन्यात १७ रुपये किलोच्या पुढे बाजार भेटला नाही. साधारणपणे १५ ते १६ ऑगस्टनंतर कांद्याचे बाजारभाव हलू शकतात असेही त्यांनी सांगितले. तीन चार महिने सांभाळूनही कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे भांडवलही गुंतले व नफाही आडकला व तीन चार महिने झाले माल संभाळून
ठेवला आहे आता तर रोजच्या पावसाने त्याला कोंबही फुटू लागले आसल्याने शेतकरी चोहोबाजूने अडचणीत सापडला आहे. त्यातच या महिनाभरात जुना कांदा विकला नाही तर ऑगस्टनंतर बाजारात नवीन लाल कांदा विक्रीसाठी येऊ शकतो अशावेळी जुन्या कांद्याला ग्राहक मिळत नाही. मिळालेच
तर ते पडीच्या भावात मातीमोल दराने मागणी करतात. बियाणांचे वाढलेले दर, खते, औषधे यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, दुर्मिळ झालेले मजूर या सर्वांना तोंड देऊन पिकवलेला कांदा तीन चार महिने संभाळूनही आज बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढत आहे.
…तर कांदा बराखीत सडण्याची भीती
उत्पादन खर्च व साठवणूक करुन ठेवलेला कांदा याचा भांडवली खर्च तेव्हाच मिळतो, जेव्हा दहा किलोस २५० रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव असतो. असा बाजारभाव मिळाला तर किमान भांडवली खर्च जाऊन थोडासा नफा शिल्लक राहू शकतो. दरम्यान, शेतकऱ्यांना कांद्याचे भाव लवकरच वाढतील, अशी आशा आहे. बराखीतील कांदा जर लवकर विकला नाही तर सडून खराब होणार व कमी बाजारभावात कांदा विकला गेला तरी नुकसानच होणार. त्यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली.
बाजारभाव वाढण्याची अपेक्षा
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा जास्त प्रमाणात साठवला आहे. नवीन कांदा बाजारात आला तर अजून बाजार खाली येतील. असे असले तरी लवकरच बाजारभाव वाढतील याच आशेवर कांदा उप्तादक शेतकरी आहे.
ऑक्टोबर पासून कांद्याची काळजी घेतली. हजारो रुपयांची खते, औषधे मारली. परंतु बाजार न वाढल्याने सर्व कांदा वखारीत टाकला आहे. आता पावसाळ्यात तो खराब होत आहे. पुढे लाल कांदा सुरू झाल्यास हा कांदा मातीमोल होईल. सगळीकडून शेतकऱ्यांचे केवळ नुकसान आहे.
ज्ञानेश्वर खराबी (शेतकरी, तिखोल)
..