नगर - सालाबादप्रमाणे कापुरवाडी येथील हजरत सय्यद इसहाक पीर मिरावली दर्गा येथे नुकतेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ...
नगर - सालाबादप्रमाणे कापुरवाडी येथील हजरत सय्यद इसहाक पीर मिरावली दर्गा येथे नुकतेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संदल उरुस कार्यक्रम संपन्न झाला.
तत्पुर्वी चितळे रोड येथील ह.सय्यद हैदरशाह मिरावली दर्गा येथे विश्वस्तांच्यावतीने फुलांची चादर व गलेफ व संदल चढविण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी दर्गाहचे वंशावळ विश्वस्त आसीफखान पीरखान पठाण, विश्वस्त चेअरमन हाजी अन्वर खान, खादीम मुजावर शफी भैय्यासाहेब जहागिरदार, सय्यद असीर फकीर मोहंमद, सय्यद बशीर अहमद प्लंबर, शेख एजाज रहेमान, करीमभाई वेल्डर, कासमभाई, अर्शद पठाण, शायर पठाण, समीर पठाण, उबेद गनी शेख, यासिर पठाण, शकिल शेख, अनीस शेख, सागर ठोकळ, नदीम शेख, फुकरा जमअतचे हुसेन शहा, मदारी बाबा आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हाजी अन्वर खान म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा अनेक साधू-संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे. हजरत सय्यद इसहाक पिर मिरावली बाबांचे कृपाशिर्वादाने लोकांच्या जीवनात येणार्या अडीअडचणी, इडापिडा, जादुटोना, मनोरुग्णांना बाबांच्या हयातीत त्यांच्या आशिर्वादाने समाधान लाभले. आजही अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्वधर्मिय हिंदू-मुस्लिम भाविक राज्यभरातून येत असतात. यंदाच्या वर्षीच्या संदल उरुसासही झालेली भाविकांची गर्दी बाबांवरील श्रद्धा दर्शविते.
चितळे रोड येथून निघालेल्या फुलांच्या चादर व गलेफच्या मिरवणुकीत सुनिल साळवे यांनी सजविलेल्या आकर्षक विद्यूत रोषणाईचा रथ. गयाजभाई सनईवाले यांचे सनई चौघडा, शहर फुकरा (फकीर) जमाअतच्या फकीरांचे अंगावर शहारे आणणारे जरब, नूर मोहंमद बारुदवाले यांच्या आकर्षक शोभेच्या दारुकाम. सय्यद असीर फकिर मोहंमद, जमील बाबा (चेतकवाला) यांचे मिलाद पार्टी पठण. शहरातील विविध बँड पथकांचे नात, कव्वालीचे वादनाने उपस्थितांची वाहऽवाह मिळविली. ही मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गाने मिरावली पहाडवर नेण्यात आली. कोतवाली पो.स्टे. व तोफखाना पो.स्टे. यांनी मिरवणुक मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
पहाटे दर्गा समाधीवर संदल, गलेफ, फुलांची चादर चढविण्यात आली. त्यानंतर मौलानांच्या हस्ते फातेहा देऊन भाविकांसाठी भंडारा, लंगर, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मिरावली पहाड येथे भिंगार कँम्प पोलिस स्टेशनचे सहा.पो.नि.शिशीर देशमुख, पो.ना.सचिन धोंडे यांच्या देखरेखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री.लहामगे यांनी उत्तम वीज वितरण व्यवस्था ठेवली होती. संदल उरुस यशस्वीतेसाठी ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. सहकार्य केलेल्यांचेही विश्वस्तांनी आभार मानले.