अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल चुकीचे व वादग्रस्त विधान करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात...
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल चुकीचे व वादग्रस्त विधान करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने होम कॉरंटाईन जनादेश जारी करण्यात आला. कोश्यारी चले जावच्या घोषणा देऊन, शाई पेनाची निप तोडून स्वाक्षरी करण्यात आलेला जनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आला. या जनादेशाची दखल न घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केंद्र सरकारला आस्था नसल्याचे जाहीर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, अर्शद शेख, सुधीर भद्रे, पोपटराव साठे, बबलू खोसला, सुनिल टाक, माजी सरपंच कैलास पठारे, उल्हास जगधने, शाहीर कान्हू सुंबे, कारभारी वाजे, नंदा साबळे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे कुलदैवत आहेत. मानवी इतिहासातील गेल्या दोन हजार वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा उन्नतचेतनेचा शासक इतर कोणीही झालेला नाही. जग जिंकण्याची इच्छा असणार्या सिकंदरापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य मोठे होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात सुद्धा या देशाची शासन प्रशासनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आचरण प्रत्येक ठिकाणी राबविले पाहिजे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. तर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह विधान केले. महापुरुषांबद्दल राज्यपालांनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांना त्यांच्या मूळ राज्यात घरी पाठविल्यास यापुढे महापुरुषांची बदनामी करण्याची त्यांना संधी मिळणार नसून, यासाठी हा जनादेश जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक सब्बन म्हणाले की, महापुरुषांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याने महाराष्ट्र आणि देशभर राज्यपाल विरोधात आंदोलने झाली. परंतु कोश्यारी यांच्या स्वभावात काही एक बदल झालेला नाही. त्यांनी जाणीवपूर्वक महापुरुषांची बदनामी केली आहे. त्यांना सार्वजनिक जीवनातून कायमचे दूर करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध होम कॉरंटाईन हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश थोरात यांनी महापुरुषांबद्दल वारंवार चुकीचे विधान करणार्या राज्यपालविषयी महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या मनात आक्रोश व संतापजनक भावना आहे. केंद्र सरकारने जनादेशाची दखल घेऊन त्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. सुधीर भद्रे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना समजून केंद्राने त्यांना परत बोलावून घ्यावे. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातच महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.