अहमदनगर (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन पुणे अहमदनगर युनिटच्या वतीने बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (दि....
अहमदनगर (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन पुणे अहमदनगर युनिटच्या वतीने बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (दि.16 जानेवारी) एक दिवसीय संप पुकारण्यात आला. लालटाकी येथील बँक ऑफ महाराष्ट्रा समोर बँकेतील कर्मचार्यांनी काम बंद करुन निदर्शने केली. या संपात शहरासह जिल्ह्यातील कर्मचारी उतरले होते. बँकचे मॅनेजमेंट कामगारांचे हक्क व अधिकार हिरावून घेत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
शहरात झालेल्या आंदोलनात कॉ. प्रकाश कोटा, कॉ. बाळासाहेब गायकवाड, कॉ. भारती असुदानी, कॉ. माणिक आडाने, कॉ. नंदलाल जोशी, कॉ. गोरख चौधरी, सोमनाथ कुर्हाडे, बाबा घोडके, संदीप शिदोरे, विनायक मेरगु, गुजराथी, सुजय नळे, छगन पवार, योगेश सोन्निस, विजय भोईटे, राहुल मोकाशी, महेश जेऊघाले, राजकुमार लोखंडे, संकेत कुलकर्णी, दत्ता म्याना, पोपट गोहाड, गणेश मेरगू, अमोल संत, महेश गायकवाड, उमेश घोडके, दिनेश कुलकर्णी, पुरन वैद्य आदी युनियनचे पदाधिकारी व बँकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
कॉ. प्रकाश कोटा म्हणाले की, बँकेच्या मनमानी कारभाराला कर्मचार्यांनी संपाने उत्तर दिले आहे. कोरोना काळात कर्मचार्यांनी जीवावर उदार होऊन सेवा दिली. यामध्ये अनेक कर्मचार्यांचे जीवही गेले. मात्र सध्या मॅनेजमेंटने त्यांच्यावर अन्याय सुरू केला आहे. लांबच्या ठिकाणी बदली करणे, निर्बंध लावून त्यांचे हक्क हिरावून घेणे, नोकर भरती न करता आहे त्या कर्मचार्यांवर अधिक कामाचा बोजा टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कॉ. माणिक आडाने म्हणाले की, युनियनने बँक व्यवस्थापनाशी संघर्ष करून, कार्यालय मिळवले होते. ते कार्यालय बँकेने काढून घेतले आहे. यामुळे युनियनला कार्यालय नसल्याने कामगारांचे प्रश्न सोडविणे, कामगारांशी चर्चा करणे व इतर ध्येय, धोरण ठरविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. या विरोधात संघटनेने आंदोलन पुकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
बँक प्रशासन मालक या भावनेने वागत असून, कर्मचार्यांना वेठीस धरले जात आहे. बँकेतील सर्व सहकारी कर्मचारी म्हणून नव्हे, तर देश सेवा म्हणून योगदान देत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. तर युनियनचे कार्यालय पुन्हा परत देऊन त्यांचे इतर प्रश्नांवर लक्ष न दिल्यास तीव्र बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.