वेब टीम: नाशिक नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडण...
वेब टीम: नाशिक
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी भाजपने पडद्यामागून सूत्रे हलवण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.
'मी माझ्या उमेदवारी ठाम होते, ठाम आहे. मी कुठेही गेली नव्हते. मला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. मी अनेक शिक्षक संघटनांशी चर्चा केली आहे. ते मला पाठिंबा देतील. पेन्शन योजना असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल, यासाठी मी निवडणुकीला उभी आहे, सर्व संघटना मला पाठिंबा देतील असा विश्वास आहे, असं शुभांगी पाटील यांनी ठणकावून सांगितलं.
'सत्यजीत तांबे यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. काँग्रेस काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. पण, मला महाविकास आघाडीवर पूर्ण विश्वास आहे, ते मला पाठिंबा देतील, असंही पाटील म्हणाल्या. 'मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे मला कुणीही संपर्क केला नाही. गिरीश महाजन यांनी संपर्क केला की नाही, त्यावर मी बोललेलं बरं नाही, असंही पाटील म्हणाल्या.
'नॉट रिचेबलवरुन तुम्ही समजू शकता. मी न बोललेलं बरं. पण मी माघार घेतली नाही', असं शुभांगी पाटील म्हणाल्या. 'माझी जनता ऐकत आहे. जनतेने धनशक्ती की जनशक्ती हे जनता ठरवेल. मला नक्की विश्वास आहे की जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास केला असेल. दोन तारखेला धनशक्ती जिंकते की जनशक्ती जिंकते हे स्पष्ट होईल', असं शुभांगी पाटील म्हणाल्या.
आज सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. त्यामुळे गिरीश महाजन हे शुभांगी पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे शुभांगी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशीही हवाही पसरली होती. परंतु, ही शक्यता फोल ठरली. नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील अखेर समोर आल्या आहेत.
शुभांगी पाटील यांना यावेळी उमेदवारी मागे घेण्यासाठी कुणाकडून दबाव टाकण्यात आला का, तसेच कुणी धमकी दिली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रत्यक्ष उत्तर न देता अप्रत्यक्षपणे हो असंच उत्तर दिलंय.