नगर : जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, पालिका, श...
नगर : जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, पालिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपाला ग्रामसेवक संघटना व जि.प.कर्मचारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. संपूर्ण राज्यात हा संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे माजी राज्याध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली.
एकनाथ ढाकणे यांनी सांगितले की, एनपीएस रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील सरकारी कर्मचारी दीर्घ काळापासून लढा देत आहेत. दि.29 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी एनपीएस हटाव दिन पाळून आंदोलन केले. परंतु, या प्रश्नात शासनाकडून अतिशय मंद गतीने कार्यवाही होत आहे. करोना महामारीच्या काळात राज्य सरकारी व इतर कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून धडाडी दाखवली. आता प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देऊन, त्या सोडविण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. कंत्राटी, अंशकालिन, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरावीत, विनाअट अनुकंपा तत्वावर नियुक्त्या मिळाव्यात, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, आगाऊ वेतन वाढीचे धोरण लागू करावे, चतुर्थश्रेणी व वाहन चालक पदे भरण्यावरील बंद हटवावी, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण बंद करावे आदी मागण्यांसाठी हा बेमुदत संप करण्यात येणार आहे.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष सुनिल नागरे, राजेंद्र पावसे, मंगेश पुंड, युवराज पाटील, अशोक नरसाळे, बी.वाय.कडू, बाळासाहेब आंबरे, रामदास गोरे, बाळासाहेब गागरे, मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष तळेकर, रावसाहेब निमसे, पुरुषोत्तम आडेप आदी उपस्थित होते.