मयत कामगार अजय साळवेच्या श्रद्धांजली सभेत मागणी, कामगारांना अश्रू अनावर ------------------------------------------------------...
मयत कामगार अजय साळवेच्या श्रद्धांजली सभेत मागणी, कामगारांना अश्रू अनावर
----------------------------------------------------------------
प्रतिनिधी : अहमदनगर रेल्वे माल धक्क्यावर माल उतरवत असताना अजय साळवे यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले होते. सुमारे चोवीस दिवस नगरला उपचार झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे मालधक्क्यावर काम करताना मृत्यू पावलेल्या कामगाराच्या वारसांना रु. १५ लाखांची मदत आणि रुग्णालयाचा संपूर्ण खर्च मिळाला पाहिजे, अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
माथाडी कामगारांच्या वतीने मालक्यावर आयोजित श्रद्धांजली सभेत काळे बोलत होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी साळवे यांच्या आठवणींना उजाळा देताना कामगारांना अश्रू अनावर झाले. यावेळी कामगार नेते विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ, राजू क्षेत्रे, अशोक जावळे, अमर डाके, देवराम शिंदे, सचिन लोंढे, गौतम सैंदाणे, दीपक काकडे, सचिन जरे, जयराम आखाडे, राधेश भालेराव, पंडित झेंडे, रोहिदास भालेराव, भाऊसाहेब अनारसे, सलीम शेख, दादा क्षीरसागर, गोरख माने, अंगद महारनवर, नाना दळवी, सुनील नरसाळे, राजेंद्र तरटे, संभाजी महारनवर, ज्ञानदेव कदम, लक्ष्मण पांढरे, महादेव टाकळकर, दत्तात्रय जाधव, दीपक गुंड, निलेश क्षेत्रे, मंगेश एरंडे, किशोर ढवळे, सुमित पळसे, आतिश शिंदे, संतोष भालेराव, अजय साळवे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे म्हणाले की, एखाद्या कंपनीत काम करताना कामगाराला अपघाती अपंगत्व आले अथवा मृत्यू ओढवला तर त्याची जबाबदारी संबंधित कंपनी घेत असते. रेल्वे मालधक्क्यावर काम करणे अत्यंत जिकरीचे आहे. सुरक्षिततेची कोणतीही साधने कामगारांना हुंडेकरी ठेकेदारांकडून पुरवली जात नाहीत. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात होतात. गंभीर स्वरूपाची इजा कामगार बांधवांना होते. याकडे माथाडी मंडळ देखील लक्ष देत नाही. कामगारांना अमानवीय वातावरणामध्ये काम करावे लागते. साळवे यांच्या निधनामुळे का होईना पण हुंडेकरी, माथाडी मंडळाला जाग आली पाहिजे. मंडळाकडून दिली जाणारी वारसांसाठीची आर्थिक मदत अल्प स्वरूपाची आहे.
किमान पंधरा लाख रुपयांची मदत झाली तर मयत कामगाराचे कुटुंबीय, मुलं त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात. यासंदर्भात कामगारांच्या शिष्टमंडळासह माथाडी मंडळाच्या अध्यक्ष, सचिवांची भेट घेतली जाईल. धोरणात्मक निर्णय करण्याची गरज असेल तर माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन कामगारांना, त्यांच्या वारसांना न्याय मिळवून दिला जाईल, असे यावेळी काळे म्हणाले. कामगार नेते विलास उबाळे म्हणाले की, कामावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यामुळे कामगारांना जबर मानसिक धक्का बसला आहे. कोणत्याही कामगारावर भविष्यात ही वेळ येऊ शकते. यामुळे हुंडेकरी, माथाडी मंडळाने कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने साधने पुरवली पाहिजेत. मंडळाने याबाबत हुंडेकरी यांना सूचना केल्या पाहिजेत. मयत कामगारांच्या पाठीशी सर्व कामगार बांधव एकजुटीने उभे आहेत.
फोटो ओळी : अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावरील मयत कामगार अजय साळवे यांच्या श्रद्धांजली सभेत कामगारांना संबोधित करताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, संजय झिंजे, आकाश आल्हाट, प्रणव मकासरे, आनंद जवंजाळ, राजू क्षेत्रे, अशोक जावळे आदी.